Join us

मुंबई शेअर बाजार ३३ अंकांनी वाढला

By admin | Updated: December 26, 2014 23:37 IST

अस्थिर वातावरणात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार अल्प प्रमाणात वाढले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३ अंकांनी वाढून २७,२४१.७८ अंकांवर बंद झाला.

मुंबई : अस्थिर वातावरणात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार अल्प प्रमाणात वाढले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३ अंकांनी वाढून २७,२४१.७८ अंकांवर बंद झाला. एचडीएफसी, सेसा स्टरलाईट, इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्यांच्या समभागांनी बाजाराला तारले. सकाळी बाजार तेजीसह उघडला. विदेशी संस्थांनी बाजारातून भांडवल काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे बाजार हळूहळू घसरणीला लागला; मात्र ही घसरण नंतर थांबली. गमावलेले अंक बाजाराने भरून काढले. सत्र अखेरीस सेन्सेक्स २२.१७ अंकांच्या अथवा 0.१२ टक्क्यांच्या वाढीसह २७,२४१.७८ अंकांवर बंद झाला. आधीच्या दोन सत्रांत सेन्सेक्सने ४९३.१८ अंक गमावले. ५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही दिवसभर खालीवर होत होता. एका क्षणी तो ८,१४७.९५ अंकांपर्यंत खाली गेला होता. नंतर त्याने उसळी घेतली. ८,२00.७0 अंकांवर बंद होताना निफ्टीने २६.६0 अंकांची वाढ नोंदविली. नव्या मासिक डेरिव्हेटिव्ह सौद्यांचा शुक्रवारी पहिला दिवस होता. आयटी, रिअल्टी आणि धातू या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना त्यामुळे मागणी होती. या बळावर सेन्सेक्स सकारात्मक पट्ट्यात राहिला. ब्रोकरांनी सांगितले की, विदेशात सध्या ख्रिसमसच्या सुट्यांचा माहोल आहे. नव्या वर्षाआधी गुंतवणूकदार मोठी जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. नव्या वर्षात विदेशी निधीचा नवा ओघ सुरू होईल.  बुधवारी विदेशी संस्थांनी २,८0८.२७ कोटी रुपयांची समभाग विक्री केली.