Join us  

मुकेश अंबानी जगातील 13 वे गर्भश्रीमंत, जाणून घ्या अदानींचा कितवा नंबर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 9:07 AM

बेजोस यांची संपत्ती गेल्या एका वर्षात 19 अब्ज डॉलरने वाढून 131 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

नवी दिल्ली - भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे जगातील 13 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सने नुकतेच यंदाच्या वर्षाताली जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. त्यामध्ये ऑनलाईन ई-शॉपिंग कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. बेजोस यांच्यानंतर बिल गेट आणि वॉरेन बफे यांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे. 

बेजोस यांची संपत्ती गेल्या एका वर्षात 19 अब्ज डॉलरने वाढून 131 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती सन 2018 मध्ये 40.1 अब्ज डॉलर एवढी होती. आता, अंबानी यांची संपत्ती 50 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. गतवर्षी जगभरातील श्रीमंतांच्या या यादीत मुकेश अंबानी हे 19 व्या स्थानी होते. मात्र, यंदाच्या उत्पन्नानुसार अंबानी यांनी 6 क्रमांकाने आघाडी घेत फोर्ब्सच्या यादीत 13 वे स्थान पटकावले आहे. तर 2017 मध्ये याच यादीत मुकेश अंबानी 33 व्या स्थानावर होते. विशेष म्हणजे या यादीत मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी हे 1349 व्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 106 अब्जाधीश भारतीयांचा समावेश आहे. या 106 भारतीयांमध्ये मुकेश अंबानी हे पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक ठरले आहेत. विप्रो कंपनीचे अझीम प्रेमजी हे या यादीत 36 व्या स्थानावर असून त्यांची संपत्ती 22.6 अब्ज डॉलर एवढी आहे. आर्सेलर कंपनीचे चेअरमन आणि सीईओ लक्ष्मी मित्तल हे 91 व्या स्थानावर आहेत. तर आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष मंगलकुमार बिर्ला हे 122 व्या स्थानावर असून अदानी समुहाचे संस्थापक अध्यक्ष गौतम अदानी 167 व्या स्थानी आहेत. या यादीत इन्फोसेस कंपनीचे प्रमुख एन. आर. नारायणमूर्ती यांचा 962 वा क्रमांक आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांना 2017 साली ग्लोबल गेम चेंजरचा दर्जाही देण्यात आला होता. फोर्ब्सने यंदाच्या 33 व्या यादीत 2153 अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. तर, 2018 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत 2208 अब्जाधीश व्यक्तींची नावे होती.  

टॅग्स :मुकेश अंबानीफोर्ब्सअ‍ॅमेझॉन