Join us

मुहूर्ताला तेजीची दिवाळी

By admin | Updated: October 24, 2014 03:46 IST

लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर (संवत २०७० संपून २०७१ सुरू) शेअर बाजारात झालेल्या व्यवहारांत तेजीचे फटाके फुटल्याने बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले

मुंबई : लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर (संवत २०७० संपून २०७१ सुरू) शेअर बाजारात झालेल्या व्यवहारांत तेजीचे फटाके फुटल्याने बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. ७५ मिनिटे झालेल्या मुहूर्ताच्या व्यवहारांत सेन्सेक्सने ६३ अंशांची उसळी घेत २६ हजार ८५१ अंशांची पातळी गाठली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीने ८ हजार अंशांचा टप्पा पार केला.मुहूर्ताच्या ट्रेडिंगबद्दल माहिती देताना शेअर विश्लेषण मुकेश मेहता यांनी सांगितले की, पाच वर्षानंतर मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्यावेळी तेजीचे सत्र कायम राहिले. गेल्या आठ महिन्यांपासून शेअर बाजारात तेजी आहेच, परंतु मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्येही तेजी कायम असल्याने आजपासून नव्या तेजीचे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे. गेल्यावर्षी लक्ष्मीपूजनापासून आजच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये भारतीय शेअर बाजारांनी सरासरी २५ टक्के परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, पारंपरिक व्यवहारांसोबत घराघरातून आॅनलाईन व्यवहार करूनही अनेक लोकांनी मुहूर्ताचे व्यवहार केले. शेअर बाजारात मुहूर्ताच्या निमित्ताने झालेल्या व्यवहारांत तेल कंपन्या, सिमेंट, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्राला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. तर, सेन्सेक्स श्रेणी व मध्यमश्रेणीतील कंपन्यांकडेही गुंतवणूकदारांचा ओढा होता. देशी गुंतवणूकदारांसोबतच विदेशी वित्तीय संस्थाही खरेदीत अग्रेसर होत्या. (प्रतिनिधी)