वॉशिंग्टन : अमेरिकी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. तथापि, व्यावसायिक वातावरणात सुधारणा होण्याची गरज आहे. विशेषत: भारताच्या करविषयक धोरणांत अधिक स्पष्टता यायला हवी. ओबामा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. आर्थिक सुधारणांची भारताकडून कशी अंमलबजावणी होते, याकडे अमेरिकी कंपन्यांचे लक्ष असल्याचेही याअधिकाऱ्याने सांगितले.अमेरिकेचे वाणिज्य (जागतिक बाजार) सहायक मंत्री अरुण कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतात व्यवसाय करण्याबाबत अमेरिकी कंपन्या आशावादी आहेत. भारत सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या सुधारणांकडे व्यवसायिक वातावरण सुधारणा करण्याचा प्रयत्न म्हणून त्या पाहत आहेत. या सुधारणांमुळे भारतीय बाजारास वृद्धीची क्षमता मिळाली आहे. तथापि, सुधारणांची अंमलबजावणी कशी होते, याकडे अमेरिकी कंपन्यांचे लक्ष आहे. विशेषत: जीएसटी विधेयकाची अंमलबजावणी कशी होते, याकडे अमेरिकी कंपन्यांचे बारकाईने लक्ष आहे. कर आकारणीत व्यापक सातत्य असेल का, याकडे कंपन्या लक्ष देऊन आहेत. आगामी वर्षात सुधारणांची अंमलबजावणी कशी होते, हे अमेरिकी कंपन्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ओबामा प्रशासना महत्त्वाची भूमिका बजावणारे अरुण कुमार हे मूळचे केरळातील आहेत. अमेरिकी आणि विदेशी वाणिज्य सेवेचे ते महासंचालकही आहेत. (वृत्तसंस्था)
भारताच्या कर धोरणात अमेरिकेला हवी आणखी स्पष्टता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 01:36 IST