मुंबई : पैशाचे हस्तांतरण सोपेपणाने, वेगाने आणि सुरक्षितपणे होईल असे नवे तंत्रज्ञान नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने विकसित केले असून, आता केवळ एसएमएसद्वारे पैशाचे हस्तांतरण करणे शक्य होणार आहे. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) असे या तंत्रज्ञानाचे नाव असून पहिल्या टप्प्यात देशातील २९ बँकांनी याचा अवलंब केला आहे. यामुळे एकाच बँकेतील दोन ग्राहक किंवा आंतरबँकिंग पैसे हस्तांतरणाचा व्यवहारही शक्य होणार आहे. सध्या देशामध्ये आॅनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग, पेमेंट बँका, मोबाईल व्हॉलेट अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय व्यवहार शक्य आहेत; परंतु याकरिता इंटरनेटची उपलब्धता ही मुख्य अट आहे; परंतु एसपीसीआयने विकसित केलेल्या यूपीआयअंतर्गत केवळ एसएमएसद्वारे पैसे ट्रान्स्फर करणे शक्य होणार आहे. मोबाईल फोन हा डेबिट कार्डाप्रमाणे काम करील. ग्राहकाला यूपीआय सेवा कार्यान्वित करण्यासाठी मोबाईलवर यूपीआयचे अॅप डाऊनलोड करावे लागेल. यामध्ये नोंदणी करून स्वत:चा युजर आयडी, पासवर्ड आणि एक ‘व्हर्च्युअल आयडी’ तयार करावा लागेल. हा ‘व्हर्च्युअल आयडी’ अतिशय महत्त्वाचा असून यूपीआय प्लॅटफॉर्मवरील व्यवहारासाठी हाच ‘आयडी’ तुमची ओळख असेल. या ‘आयडी’च्या माध्यमातून व्यवहार होतील. यूपीआयच्या अॅपचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, या अॅपवर तुम्हाला तुमच्या सर्व बँक खात्यांची नोंदणी करता येईल. तसेच, कोणताही आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला तो तुमच्या कोणत्या खात्यावरून करायचा आहे, याचा पर्याय निवडता येईल आणि त्या खात्याद्वारे तो व्यवहार करता येईल. या सेवेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जर तुम्हाला कुणाकडून पैसे हवे असतील अथवा येणे असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही ‘पैसे देण्याची रिक्वेस्ट’ टाकण्याची सेवाही उपलब्ध करून दिली आहे. सध्या देशातील २९ बँकांनी या प्रणालीचा अवलंब करत ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. येत्या वर्षभरात आणखीही बँका या सेवेत सहभागी होतील. परिणामी, या सेवेची व्याप्ती आणखी वाढेल. (प्रतिनिधी)व्हर्च्युअल आयडी- ग्राहकांना यूपीआयचे अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल.- अॅपवर नोंदणी करून व्हर्च्युअल आयडी तयार करावा लागेल. हाच ग्राहकाची ओळख असेल.- पैसे हस्तांतरित करायचे असतील त्यावेळी तुमच्याकडे केवळ समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर अथवा ‘व्हर्च्युअल आयडी’ असणे गरजेचे आहे. - ज्याच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करायचे आहेत, त्याचा मोबाईल नंबर अथवा ‘व्हर्च्युअल आयडी’ टाकून, रकमेचा उल्लेख करून त्या व्यक्तीच्या मोबाईलवर एसएमएस केला, की संबंधित व्यक्तीच्या खात्यात तात्काळ पैसे जमा होतील.
पैशाचे हस्तांतरण एसएमएसवर!
By admin | Updated: April 14, 2016 01:13 IST