Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनी पानासाठी - पीक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकांची आघाडी

By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST

पीक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकांची आघाडी

पीक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकांची आघाडी
राज्यात १० हजार २४२ कोटींचे कर्ज वाटप : चंद्रपूर बँकेने वाटले ३६३ कोटी १५ लाखांचे कर्ज
मंगेश भांडेकर / चंद्रपूर
अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. यातच बँकांनीही बळीराजाला कर्ज देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षात राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी तब्बल १०२४२.५९ कोटी रुपयांचे कर्ज शेतकर्‍यांना वाटप करून इतर बँकांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे.
यावर्षी खरीप हंगामासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांना खरिपासाठी ३७४ कोटी ५७ लाख तर रबी हंगामासाठी १६० कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता कोणत्याही बँकेने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन्ही हंगामातील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मध्यवर्ती बँकेच्या राज्यभरातील शाखांनी आतापर्यंत १०२४२.५९ कोटींचे कर्ज वाटले आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्ज वाटपाची टक्केवारी ११७ आहे. ही टक्केवारी इतर कोणत्याही बँकांना पूर्ण करता आलेली नाही. या बँकेच्या तुलनेत महाराष्ट्र बँकेने ९२ टक्के कर्ज वाटप केले आहे.
दरवर्षी अवकाळी पाऊस, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. विविध बँकांचे कर्ज शेतकर्‍यांवर असून आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. मात्र, शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी कर्ज वाटप चालू ठेवले आहे. खरीप हंगाम तसेच रबी हंगाम अशा दोन्ही स्वरुपाच्या हंगामांसाठी कर्ज देण्याची व्यवस्था बँकांनी केली आहे. त्यामुळे दारिद्र्याचे जीवन जगणार्‍या शेतकर्‍यालाही कर्ज मिळत असल्याने त्याला शेती करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
----------------
चौकट
राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर
- केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आधार कार्ड योजनेअंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विविध योजनांचा अनुदान जमा होत आहे. लाभार्थ्यांना नि:शुल्क खाते उघडून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत खातेदार वाढत असले तरी, कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मात्र वाढलेले नाही. कर्ज उचलण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या अटी जाचक असल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे. त्यामुळे या बँका सहकारी बँकेच्या तुलनेत कर्ज वाटपात पिछाडीवर आहेत.

कोट
ग्रामीण भागात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना सावकारांकडे न जाता बँकेत कर्ज मिळत आहे. बँकेशी नोकरदार, शेतकरी वर्ग जुळलेला असून कर्ज वाटप करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. बँकेने रुपे डेबिट कार्ड योजना सुरु केली असून या योजनेमुळे जिल्ह्यातील ९३ शाखांच्या ग्राहकांसाठी आर्थिक व्यवहार अधिक सोपस्कर होणार आहे.
- शेखर धोटे
अध्यक्ष, जिल्हा मध्य. बँक, चंद्रपूर