Join us

मोदी सरकारकडून देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग

By admin | Updated: August 25, 2015 04:06 IST

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निर्देशांक कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निर्देशांक कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शरसंधान केले.शेअर बाजार सातत्याने कोसळत असून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे, याकडे काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी लक्ष वेधले. गेल्या आठ वर्षांत गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोने आणि पैशाची चोरी ऐकली असेल मोदींच्या राज्यात कांद्याचीही चोरी सुरू आहे. ताटातून डाळ गायब झाली आहे, मात्र मोदी सरकारला काहीही दिसत नाही. ‘घर की मुर्गी दाल बराबर’ ही म्हण खरी ठरत आहे. राजनाथसिंग २०१३ मध्ये म्हणाले होते की, संपुआ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रुपयाची किंमत घसरत आहे. हे सरकार आयसीयूमध्ये आहे. मग आता रुपया व्हेंटीलेटरवर आहे काय? असा सवाल अजय कुमार यांनी त्यांच्या विधानाचे स्मरण करवून देत केला. आर्थिक विकासाचे नारे दिले जात आहे, मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. हाच क्रम सुरू राहिला तर देश अनेक शतके मागे जाईल, असेही ते म्हणाले.