Join us

मोबाईल इंटरनेटचे दर चार महिन्यांत दुप्पट

By admin | Updated: October 6, 2014 02:31 IST

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल इंटरनेट सेवेचे दर टप्प्याटप्प्याने दुप्पट केले आहेत.

नवी दिल्ली : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल इंटरनेट सेवेचे दर टप्प्याटप्प्याने दुप्पट केले आहेत.ताजी दरवाढ एअरटेलने केली असून या कंपनीचे दर ३३ टक्क्यांनी वाढले आहेत. याआधी वोडाफोन व आयडिया या कंपन्यांनी मोबाईल इंटरनेटचे दर जूनपासून हळूहळू वाढविले आहेत. देशभरातील मोबाईल इंटरनेट ग्राहकांपैकी ५६ टक्के ग्राहक या तीन कंपन्यांकडे आहेत.एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांच्या १ जीबी २ जी मोबाईल इंटरनेट पॅकचा दर जूनमध्ये सुमारे १५५ रुपये होता. तो आता वाढून १७५ रुपयांपर्यंत गेला आहे. मात्र, याची अधिकृत माहिती देण्यासाठी या कंपन्यांचा प्रवक्ता उपलब्ध होऊ शकला नाही; परंतु वोडाफोनच्या प्रवक्त्याने दरवाढीस दुजोरा देताना सांगितले की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी आम्ही २ जीच्या १ जीबी पॅकचे बेस टॅरिफ १५५ रुपयांवरून वाढवून १७५ रुपये केले. टप्प्याटप्प्याने हा वाढीव दर देशाच्या सर्व परिमंडळांमध्ये लागू करण्यात आला आहे.उपलब्ध माहितीनुसार वोडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांनी कोणत्याही आॅफर किंवा स्कीमखेरीज असलेले त्यांचे रॅक रेट दर १० केबी डेटासाठी २ पैशांवरून वाढवून चार पैसे म्हणजे १०० टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत. याचा अर्थ असा की, वोडाफोन किंवा आयडियाच्या २ जी किंवा ३ जी नेटवर्कवरून, मोबाईल इंटरनेटचा वापर करून १ जीबी डेटा डाऊनलोड केला, तर आता ४,००० रुपये लागतात. आधी हा दर दोन हजार रुपये होता. हीच सेवा या कंपन्या स्कीमखाली सुमारे १७५ रुपयांना देत आहेत.एअरटेलने त्यांच्या मोबाईल इंटरनेटच्या दरात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून वाढ करणे सुरू केले. आता ही कंपनीदेखील वोडाफोन व आयडिया इतकाच म्हणजे १० केबीसाठी ४ पैसे असा दर आकारत आहे. मात्र, ही वाढ फक्त ३३ टक्के दिसते कारण एअरटेलचा १० केबीचा दरच मुळात २ नव्हे तर ३ पैसे होता.२ जीच्या १० केबीसाठी १० पैसे हा एअरटेलचा डेटा पॅक दर या तिन्ही कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे. म्हणजेच जी सेवा कंपनी स्कीमखाली १७६ रुपयांत देते तीच सेवा स्कीमशिवाय घेतली तर आता ग्राहकास १० हजार रुपये मोजावे लागतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)