मुंबई : स्पेक्ट्रम लिलावाच्या किमतीने एकीकडे एक लाख ९ हजार कोटी रुपयांचा आकडा पार केल्याने सरकार जरी खुश असले, तरी लिलावाच्या वाढीव बोलीसाठी मोबाईल कंपन्यांच्या कर्जाच्या उचलीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने याचा थेट फटका हा ग्राहकांना बसणार असून, मोबाईलच्या बिलात किमान २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे, स्पेक्ट्रमच्या व्यवहारापोटी सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा एकरकमी भरणा येत्या ३१ मार्चपर्यंत करायचा असल्याने येत्या एप्रिलच्या बिलापासूनच कदाचित ग्राहकांना वाढीव दराचा शॉक बसेल.गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया बुधवार (२५ मार्च) रोजी संपली. या कंपन्यांनी एकूण १,०९,८७४,९१ कोटी रुपयांची अंतिम बोली लावली आहे. सरकारने निश्चित केलेल्या किमान आरक्षित मूल्यानुसार ही रक्कम ६५,४६३,४० रुपये एवढी होते; परंतु ही बोली लावण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्जाची उचल केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, या बोलीनंतर मोबाईल कंपन्यांच्या डोक्यावरील एकत्रित कर्जाचा आकडा हा अडीच लाख कोटी रुपयांवरून साडेतीन लाख कोटी रुपये इतका झाला आहे. तसेच, या व्यवहाराची निश्चिती करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना सुमारे २५ हजार कोटी रुपये येत्या ३१ मार्चपर्यंत तातडीने भरावे लागणार आहेत. आतापर्यंत अशा पद्धतीच्या व्यवहाराचा पूर्वानुभव लक्षात घेता हा वाढीव बोजा ग्राहकांच्या खिशातून वसूल होईल, असे विश्लेषण दूरसंचार क्षेत्रातील अभ्यासकांनी केले आहे. (प्रतिनिधी)४दूरसंचार कंपन्यांनी स्पेक्ट्रम सेवेसाठी विक्रमी बोली लावल्यामुळे फोन कॉलच्या दरात भरमसाट वाढ होण्याची शक्यता दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेटाळली आहे. मोबाईल कॉलचे दर वाढणार असल्याचा गाजावाजा केला जात आहे. दूरसंचार कंपन्या २० वर्षे सेवा देणार असल्यामुळे दरवर्षीचा बोजा ५३०० कोटी रुपयांचा असून प्रति मिनिट १.३ पैसे हा दर राहील, असे त्यांनी एका पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
मोबाईल संभाषण महागण्याची चिन्हे
By admin | Updated: March 26, 2015 23:39 IST