कोची : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यामुळे महिलांची सामजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास लक्षणीय मदत झाली आहे, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणाअंती काढण्यात आला आहे. केरळ मत्स्य आणि सागरी अभ्यास विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार या योजनेत काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ९७.३ टक्के आहे. हे सर्वेक्षण अलपुझा जिल्ह्यातील मनरेगा योजनेच्या प्रभावाचे आकलन करण्यासाठी करण्यात आले आहे. केरळ राज्य ग्रामीण विकास संस्थेच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आले.गरिबी निर्मूलनासोबत महिला आणि दुर्बल घटकांतील लोकांच्या सशक्तीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे महिला तणावमुक्त झाल्या आहेत. जवळपास ६० टक्के मजुरांच्या मते या योजनेमुळे रोजीरोटीची चिंता उरली नाही. ४० टक्के मजुरांच्या मते या योजनेतून सशक्तीकरणासाठी अतिरिक्त उत्पन्न हाती पडते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २७ टक्के लोकांच्या मते या योजनेमुळे बचतीची सवय लागली. या योजनेतील मजुरांना सात दिवसांच्या आत मजुरी मिळावी आणि योजनेच्या व्याप्तीत कृषी क्षेत्राशी संबंधित कामाचा समावेश करण्यात यावा.
मनरेगामुळे महिलांची स्थिती सुधारली
By admin | Updated: October 27, 2014 01:33 IST