Join us

सोन्याच्या भावात किरकोळ सुधारणा

By admin | Updated: July 31, 2014 23:26 IST

सणासुदीच्या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी स्टॉकिस्ट व किरकोळ ग्राहकांकडून खरेदीत वाढ झाली.

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी स्टॉकिस्ट व किरकोळ ग्राहकांकडून खरेदीत वाढ झाली. परिणामी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दोन दिवसांपासून घसरत असलेल्या सोन्याचा भाव गुरुवारी ४५ रुपयांच्या अल्प सुधारणेसह २८,२४५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणेनिर्मात्यांकडून चांगली खरेदी झाल्याने चांदीचा भाव आणखी १०० रुपयांनी बळकट होऊन ४४,९०० रुपये प्रतिकिलो राहिला. श्रावण महिन्यासोबत सणासुदीचा काळही सुरू झाला आहे. या काळातील ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सोन्याची खरेदी झाल्याने यात सुधारणा झाली. दिल्ली बाजारातच ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ४५ रुपयांनी वधारून अनुक्रमे २८,२४५ रुपये आणि २८,०४५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. यात गेल्या दोन दिवसांत १७० रुपयांची घट झाली. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,७०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव १०० रुपयांनी वधारून ४४,९०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १२५ रुपयांच्या तेजीसह ४४,३६० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. यात काल ४०० रुपयांची वाढ झाली होती. मात्र, चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ७७,००० रुपये आणि विक्रीसाठी ७८,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)