दूध भेसळ नेस्तनाबूत करणार अभियान राबविणार : अन्न सुरक्षा आयुक्तांची ग्वाही
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST
दूध भेसळ नेस्तनाबूत करणार अभियान राबविणार : अन्न सुरक्षा आयुक्तांची ग्वाही
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यात अन्नसुरक्षा व अन्न साक्षरता अभियान राबवून निर्भेळ शुद्ध व दर्जेदार दूध सर्वांना मिळण्यासाठी छापासत्र हाती घेऊन दूध भेसळ नेस्तनाबूत करणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे दिली.नव्याने अस्तित्वात आलेला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अत्यंत कठोर तरतुदी आहेत. आपण आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक पारदर्शी व लोकाभिमुख करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार कोणत्याही आस्थापनेसाठी ३० दिवसांत परवाना दिला जाईल. त्यासाठी ऑनलाईन व्यवस्था सुरू केली आहे. राज्यातील नागरिकांना शुद्ध, निर्भेळ दूध मिळून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. जळगाव जिल्ह्यातून त्याची सुरूवात झाली असून तेथे १५ दूध प्रकल्पांवर एकाचवेळी छापे टाकून ८ दोषी प्रकल्प चालकांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित घटकांचे प्रबोधन, जनजागृतीसोबतच अधिकारी, कर्मचार्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे.आपण जे अन्न खातो ते कसे आहे? बनवतो ते कसे आहे? त्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, ग्राहकांपासून ते अंगणवाडी सेविका, उत्पादक आदी घटकांचे प्रबोधन करणार आहोत. तक्रारी, सूचनांसाठी आयुक्त कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)-----------------तक्रारीसाठी क्रमांकदूध, खाद्यपदार्थ अथवा इतर कोणत्याही अन्न पदार्थातील भेसळ व दर्जाबाबत तक्रार करण्यासाठी मुंबईत नियंत्रण कक्ष सुरू झाला आहे. त्याचे दूरध्वनी क्रमांक (०२२) २६५९२३६२, २६५९२३६३, २६५९२३६४ असे आहेत. हे दूरध्वनी २४ तास सुरू राहतील.----------------श्रीरामपूरमध्ये २ वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या रासायनिक व दूध भेसळीच्या प्रकरणाबाबत माहिती घेऊन यात कारवाई करण्यात कोणी हलगर्जीपणा केल्याचे दिसून आल्यास अधिकारी, कर्मचार्यांविरूद्ध कारवाई होईल. गेल्याच महिन्यात शिर्डी संस्थानच्या लाडूंचे नमुने घेतले आहेत. भेसळखोर सुटू नयेत, यासाठी प्रयत्न केला जाईल.- डॉ. पुरूषोत्तम भापकर, अन्न सुरक्षा आयुक्त -----------------