अकोला : सूक्ष्म सिंचनासाठी ठिबक, तुषार संच खरेदी करताना ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती घेतली, त्याच शेतकऱ्यांना अनुदान देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे २०१३-१४ मधील जवळपास ३५ कोटी व २०१४-१५ मधील १३७.२७ कोटी रुपये रखडले आहेत; यापैकी ६१.२६ कोटी रुपये अनुदान दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत २०१३-१४ चे ३५ कोटी व २०१४-१५ मधील १३७.२७ कोटी रुपये शासनाकडे थकले आहेत. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत ठिबक, तुषार संच खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येत असते. २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये शेतकऱ्यांनी हे संच खरेदी केले आहेत. यातील ६१.२६ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना शासनाने पूर्वसंमती दिली आहे. त्यापैकी १८ कोटी रुपये शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. हे अनुदान ज्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन संच खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती घेतली, त्यांनाच देण्यात येत आहे. हा निर्णय २९ आॅक्टोबर २०१५ रोजी शासनाने घेतला असून, या संदर्भातील पत्र नुकतेच संबंधित विभागांना मिळाले आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, ठिबक, तुषार संच खरेदी करताना पूर्वसंमती न घेतलेल्या उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील दोन्ही वर्षांचे अनुदान अदा करण्यात आले आहे. मग विदर्भासाठी वेगळा निर्णय कसा, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.६१.२६ कोटींपैकी १८ कोटींचे वितरण करण्यात आले आहे. ४३.२६ कोटींचे अनुदान २०१५-१६ वर्षासाठी मंजूर झालेल्या निधीतून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. यामध्ये २०१३-१४ चे ७.६९ लाख व उर्वरित २०१४-१५ मधील ४३.१८ कोटी रुपये अनुदानाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे उर्वरित अनुदानाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यात सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यातील २०१३-१४ चे ३५ कोटी व २०१४-१५ चे ५५ कोटी रुपये अनुदान आहे.
सूक्ष्म सिंचन योजनेचे अनुदान रखडले!
By admin | Updated: November 16, 2015 00:05 IST