Join us  

व्यापारी मार्ग आणि मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 2:02 AM

सोपारा, कल्याण सारखी इतरही काही बंदरे आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात. चौल हे यापैकीच एक.

- डॉ. सूरज अ. पंडितसोपारा, कल्याण सारखी इतरही काही बंदरे आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात. चौल हे यापैकीच एक. ‘पेरिप्लस आॅफ द एरिथ्रियन सी’ या ग्रंथात कल्याणच्या दक्षिणेला असलेल्या ‘सेमूल’ अथवा ‘तीमुल’ या बंदराचा उल्लेख येतो. हे बंदर म्हणजेच कुंडलिका नदीच्या मुखाशी वसलेले आजचे चौल. येथील आगरकोट परिसरात प्राचीन बंदर असावे. नद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि बदलणारी समुद्राची जलपातळी यामुळे आत्ताची भूरचना, प्राचीन काळच्या भूस्वरूपापेक्षा भिन्न आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. इ.स. सहाव्या शतकात भारतात भेट दिलेल्या ‘कॉस्मस’ नामक व्यापाऱ्याने या बंदराला ‘सीबोर’ असे म्हटले आहे. अनेक मध्ययुगीन अरब प्रवाशांनी, व्यापाऱ्यांनीही या प्राचीन बंदराचा उल्लेख केलेला होता. आज चौलमध्ये हिंगलाज देवीचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बौद्ध लेण्यांचा काळ आजपासून साधारण अठराशे वर्षे मागे जातो. अशा या बंदरातून एका प्राचीन व्यापारी मार्गाची सुरुवातहोत होती. दख्खनच्या पठारावर ताम्हणी घाटातून जाणारा हा मार्ग अगदी मध्ययुगापर्यंत महत्त्वाचा मानला गेला. आधुनिक काळात मुंबई बंदराच्या उदयानंतर चौलचे महत्त्व कमी झाले.सोपारा, कल्याण आणि घारापुरीच्या प्राचीन बंदरातून पनवेल जवळून जाताना, हा व्यापारी मार्ग डूंगी गावातील एका अपूर्णावस्थेतील पाचव्या शतकातील लेण्याच्या परिसरातून जात असे. पुढे कर्जतजवळील कोंढाण्याच्या लेण्यांपासून कार्ल्याच्या लेण्यांपर्यंत जाणारा आणखी एक व्यापारीमार्ग होता. कार्ल्याच्या लेण्यात क्षत्रपराजा नहपानाच्या उषवदात नावाच्या जावयाने दान दिल्याचा उल्लेख एका लेखात येतो. वलूरक (कार्ल्याचे प्राचीन नाव) येथील महासांघिक भिक्षूसंघाला मामाल विषयातील करजिक (कर्जत) नावाच्या गावाचे हे दान आहे. या पुराव्यांवरून प्राचीन व्यापारी मार्गाचा अंदाज करता येतो.भीमाशंकर परिसरात अनेक लहान मोठ्या घाटवाटा आहेत. कल्याणमार्गे आंबिवली लेण्यांजवळील गणपती घाटाने भीमाशंकरपर्यंत जाण्याचा मार्गहाही एक प्राचीन व्यापारी मार्ग असावा.समुद्र्रकिनारी वसलेल्या व्यापारी बंदरांवरून पठारावर जाणारा बहुकचर्चित मार्ग म्हणजे नाणेघाट. सोपारा-कल्याणवरून एक व्यापारी मार्ग सरळ नाणेघाटपर्यंत जातो. येथून वर चढून गेल्यावर पुढे जुन्नरची प्राचीन नागरी वसाहत होती. या परिसरातील अनेक बौद्धलेणी आणि बहुतांश मध्ययुगीन किल्ले यांचा या प्राचीन व्यापारी मार्गांशी जवळचा संबंध आहे. मुंबई परिसरातून जाणाºया या महत्त्वाच्या व्यापारी मार्गांनी या परिसराला समृद्धी प्राप्त करून दिली.कुठलाच व्यापारी मार्ग प्रत्यक्ष मुंबई बेटावर येत नव्हता. तरीही या परिसरातील सगळ्यात मोठ्या लेणीसमूहाचा, कान्हेरीचा जन्म मुंबई बेटावर झाला. अर्थात, समुद्रकिनाºयावरून दख्खनच्या पठारावर जाण्यासाठी मुंबई बेटावर येण्याची काहीच गरज नव्हती, तरीही इ.स.वि. सनाच्या पूर्वी पहिल्या शतकात सोपाºयाचे काही भिक्षू कान्हेरीला आले आणि कान्हेरीचा जन्म झाला.सोपारा, कल्याण, चौल येथील उपासक कान्हेरीच्या भिक्षूसंघाला दान देऊ लागले. याचाच अर्थ मुंबई बेटावर जन्मलेल्या कान्हेरीचा धार्मिक केंद्र अथवा तीर्थक्षेत्र म्हणून लौकिक पसरू लागला होता. भगवान बुद्धांनी सोपारा व पडणच्या लेण्यांना भेट दिल्याची कथा आपण पूर्वीच पाहिली आहे.याच पार्श्वभूमीवर कान्हेरीचा भिक्षूसंघ बहरू लागला. इ.स.वि.सनाच्या दुसºया शतकात त्याच्या सुवर्ण युगाची सुरुवात झाली. त्याची कीर्ती काहीच काळात दिगंत पसरली. सिंध प्रांतातील एका उपासकाने कान्हेरीला सारिपुत्ताचा ‘शारीर स्तूप’ बांधण्यासाठी दान दिले. या कान्हेरीच्या जन्माची कथा आपण पुढील लेखात पाहणार आहोत.(लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)२४१ं्नस्रंल्ल्िर३‘ंल्लँी१्र@ॅें्र’.ूङ्मे