नवी दिल्ली : वित्तीय समायोजन कार्यक्रमांतर्गत उघडण्यात आलेल्या जनधन बँक खात्यांचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याबाबत सरकार आता विचार करीत आहे. सरकारी बँकांचे अधिकारी आणि व्यापार प्रतिनिधी यांच्यासमवेत याबाबत चर्चा करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पुढील आठवड्यात मंगळवारी बैठक आयोजिण्यात आली आहे.वित्तीय समायोजन कार्यक्रम राबविताना तो तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापार प्रतिनिधी प्रयत्न करीत असतात. या प्रतिनिधींना तसेच बँकांना येणाऱ्या अडचणींवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. या प्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या मानधनासह प्रोत्साहन भत्ता, त्यांना उपलब्ध असलेली तांत्रिक मदत या बाबींवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँकेच्या ८० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जनधन खात्यात १४ हजार कोटी रुपये जमा झाले असून आता या खात्यांमधील व्यवहार वाढविण्याचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले होते. बिझनेस कॉरस्पॉडंटस् फेडरेशन आॅफ इंडियाच्या रेग्युलेटरी अफेअर्स कमिटीचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात ते म्हणाले, की जनधन खात्यातील व्यवहार न वाढण्यामागे विविध कारणे आहेत. पॉर्इंट आॅफ सेलमार्फत रक्कम काढण्याची सध्याची १ हजार रुपयांची मर्यादा ५ हजार रुपयांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. या बैठकीत व्यापार प्रतिनिधी अथवा बँकमित्रांना देण्यात येणारे मानधन योग्य त्या स्वरूपात असावे, यावर चर्चा होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जनधन खात्यांचा उपयोग वाढविण्यासाठी उपाय
By admin | Updated: April 11, 2015 01:22 IST