Join us  

Matchbox Price Increase: महागाईत आता माचिसही 'काडी' टाकणार; 14 वर्षांनी वाढणार दर, खिशाला 'आग' लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 10:58 AM

Matchis Price Increase: डिझेलच्या वाढत्या किंमतींनीही त्यामध्ये आणखी खर्च वाढविल्याचे या कंपन्यांनी म्हटले. प्रमुख पाच कंपन्यांनी सर्वसहमतीने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या सर्वांच्या घरी 'आग' पेटविण्यासाठी माचिस (MatchBox) हमखास वापरली जाते. जरी आता लायटर आले असले तरीदेखील देवघरात तरी निदान माचिस बघायला मिळतेच मिळते. गेल्या काही वर्षांत ही माचिस हलकी जरूर झाली तरी तिचे दर वाढले नव्हते. कांड्या कमी करण्यात आल्या परंतू तिचा दर तेवढाच ठेवण्यात आला होता. परंतू आता सारे आवाक्याबाहेर गेले आहे. ही माचिसही आता महागाईच्या (Inflation) विळख्यात सापडल्याने दरवाढ होणार आहे. 

जवळपास 14 वर्षांनी माचिसचा दर वाढणार आहे. ही माचिस थोडीथोडकी नव्हे दुप्पट दराने वाढणार आहे. 1 डिसेंबरपासून ही माचिस 1 रुपयांऐवजी आता दोन रुपयांना मिळणार आहे. प्रमुख पाच कंपन्यांनी सर्वसहमतीने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 2007 मध्ये 50 पैशांना मिळणारी माचिस 1 रुपया करण्यात आली होती. आता या नव्या दरवाढीचा निर्णय गुरुवारी शिवकाशीमध्ये ऑल इंडिया चेंबर ऑफ माचिसच्या बैठकीत घेण्यात आला. 

उद्योग प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे कारण दिले आहे. माचिस बनविण्यासाठी 14 प्रकारच्या कच्च्या मालाची गरज लागते. यामध्ये 1 किलो लाल फॉस्फरस 425 रुपयांवरून वाढून 810 रुपये झाला आहे. याच प्रकारे मेण 58 रुपयांवरून 80 रुपये, बॉक्स बोर्ड 36 रुपयांवरून 55 रुपये, आतील बॉक्स 32 वरून 58 रुपये झाला आहे. कागद, स्प्लिंट्स, पोटेशियम क्लोरेट आणि सल्फरच्या किंमतींमध्येही 10 ऑक्टोबरपासून वाढ झाली आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतींनीही त्यामध्ये आणखी खर्च वाढविल्याचे या कंपन्यांनी म्हटले. 

नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे सचिव वीएस सेथुरथिनम म्हणाले की 600 माचिस बॉक्सचे एक बंडल 270 ते 300 रुपयांना विकले जात आहे. हे बंडल 430-480 रुपये करण्यात येणार आहे. यामध्ये 12 टक्के जीएसटी आणि वाहतूक खर्च नाही. 

टॅग्स :महागाई