Join us

बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स पुन्हा २६ हजारांवर

By admin | Updated: August 14, 2014 23:43 IST

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १८४ अंकांच्या तेजीसह २६ हजार अंक पार करत जवळपास तीन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १८४ अंकांच्या तेजीसह २६ हजार अंक पार करत जवळपास तीन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. खरेदीचा मारा, भांडवल प्रवाह आणि ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई घटल्याने बाजारात तेजी नोंदली गेली.तीस कंपन्यांचा सेन्सेक्स जोरदार मुसंडीसह २५,९४८.३० अंकांवर उघडला आणि एकावेळी २६,१३५.०० अंकांपर्यंत पोहोचला. अखेरीत तो १८४.२८ अंक वा ०.७१ टक्क्यांनी वधारून २६,१०३.२३ अंकांवर बंद झाला. २५ जुलैनंतर पहिल्यांदाच सेन्सेक्सने ही पातळी गाठली. त्यादिवशी सेन्सेक्स २६,१२६.७५ अंकांवर बंद झाला होता. तथापि, ३० जुलै रोजीही सेन्सेक्स २६ हजारांच्या पातळीवर जाऊन पुन्हा २६,०८७.४२ अंकांवर बंद झाला. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्स ७७४ अंक वा ०३.०६ टक्क्यांनी बळकट झाला. ५० शेअर्सचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ५२.१२ अंक वा ०.६७ टक्क्यांच्या तेजीसह ७,७९१.७० अंकावर बंद झाला. दिवसभरात निफ्टी ७,७९६.७० अंकांपर्यंत गेला होता.कोटक सिक्युरिटीजचे प्रमुख (खासगी ग्राहक) दीपेन शाह यांनी सांगितले की, बाजार शुक्रवारी ०.५ टक्क्यांनी वधारला होता. या आठवड्यात तो ३ टक्क्यांहून अधिकने मजबूत झाला. सरकारद्वारे सुधारणांना चालना देण्याची अपेक्षा आणि जगभरात भू-राजकीय तणाव कमी होत असल्याने बाजारात हा कल दिसून आला.बीएसईच्या १२ श्रेणीबद्ध निर्देशांकात १० ला लाभ झाला. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, बांधकाम, धातू, तेल, गॅस आणि ऊर्जा शेअरमध्ये तेजी नोंदली गेली तर आयटी व तंत्रज्ञान शेअर्समध्ये घसरण राहिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद राहील. (प्रतिनिधी)