Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात तेजी; सेन्सेक्स ३१९ अंकांनी वाढला

By admin | Updated: May 24, 2014 04:20 IST

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारच्या सत्रात ३१९ अंकांच्या वाढीसह २४,६९३.३५ या नव्या उच्चांकावर बंद झाला.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारच्या सत्रात ३१९ अंकांच्या वाढीसह २४,६९३.३५ या नव्या उच्चांकावर बंद झाला. स्टेट बँक आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमुळे शेअर बाजारात तेजी आली. भारतीय स्टेट बँकेचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा अधिक आले आहेत. तीस कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स मजबुतीसह उघडून २४,७४५.८६ अंकांवर पोहोचला होता. अखेरीस बाजार ३१८.९५ अंकांनी किंवा १.३१ टक्क्याने वधारून २४,६९३.३५ या विक्रमी उच्चांकावर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीसुद्धा ९०.७० अंकांनी किंवा १.२५ टक्क्याने वाढून ७,३६७.१० अंकावर बंद झाला. स्टेट बँकेचा शेअर १० टक्क्यांनी वाढून तीन वर्षांच्या उच्चांकार बंद झाला. विश्लेषकांनी सांगितले की, बँकांच्या नफ्यात ८ टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित होती; परंतु ही घट अपेक्षेपेक्षा कमी आहे. गुंतवणूकदारांनी एनटीपीसी तथा टाटा पॉवरसह अनेक वीज कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. मोदींच्या नेतृत्वातील सरकार सौर ऊर्जा व पवन ऊर्जेच्या विकासाला गती देतील, या वृत्तानंतर वीज कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. अडाणी पॉवर, रिलायन्स पॉवर, पॉवरग्रिड तथा जेपी पॉवर आदी कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० पैकी २२ कंपन्यांचे शेअर्स फायद्यात राहिले. (प्रतिनिधी)