प्रसाद गो. जोशी - भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या पतधोरणाने निराशा केल्यानंतर बाजाराला आलेली मरगळ मुडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने भारताच्या पतदर्जात वाढ करून घालवली. यामुळे मागील सप्ताहातील तेजी कायम राखण्यात बाजार यशस्वी झाला. परकीय वित्तसंस्थांनी चालू ठेवलेली खरेदी बाजार वर आणण्याला हातभार लावणारी राहिली.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात संमिश्र वातावरण राहिले. बाजारात प्रारंभी असलेले निराशेचे वातावरण कालांतराने आशादायक बनले आणि सप्ताहाच्या अखेरीस बाजाराचे निर्देशांक पुन्हा हिरव्या रंगामध्ये बंद झालेले दिसले. सलग दुसरा सप्ताह बाजारात तेजीचा राहिला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहभरात २.१९ टक्के म्हणजेच ६१९.२४ अंशांनी वाढून २८८७९.३८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)२.२६ टक्के म्हणजेच १९४.१० अंशांनी वाढला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ८७८०.३५ अंशांवर बंद झाला. परकीय वित्तसंस्थांनी जोरदार खरेदी केल्याने मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली. या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीला वाव असल्याने त्यामधील समभागांच्या खरेदीला अधिक पसंती लाभत असल्याचे दिसते. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ३.१९ आणि ६.२८ टक्कयांनी वाढ झालेली दिसून आली. भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये सर्व दर कायम राखल्याने बाजाराची निराशा झाली. बाजाराला व्याजदरांमध्ये घट होण्याची अपेक्षा होती मात्र वाढत्या महागाईने रिझर्व्ह बॅँकेने कपात टाळली. मात्र बॅँका याबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतात असे सांगत रिझर्व्ह बॅँकेने आता चेंडू बॅँकांकडे टाकला आहे.
‘मुडीज’च्या हातभाराने सांभाळला बाजाराचा मूड
By admin | Updated: April 13, 2015 04:05 IST