मुंबई : प्लॅस्टिक बॅगा व तत्सम वस्तूंचे उत्पादन, वितरण व विक्रीवर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व प्लॅस्टिक उत्पादकांच्या अन्य संघटनांतर्फे २३ फेब्रुवारी २०१८ रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.प्लॅस्टिकवरील बंदी म्हणजे, रोगापेक्षा औषध भयंकर असा प्रकार असून, या व्यवसायात कार्यरत असलेले लाखो लोक त्यामुळे उद्ध्वस्त होतील, असे उत्पादकांचे म्हणणे आहे. प्लॅस्टिकवर बंदी घालून कागद वा काचांचा वापर केल्याने पर्यावरणाचे अधिक नुकसानच होईल, कागदाचा वापर वाढल्याने, त्यासाठी प्रचंड वृक्षतोड आणि पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल, असे प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अध्यक्ष रवी जसनानी यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले.याशिवाय विविध बँकांनी प्लॅस्टिक व्यवसायासाठी वित्तीय साह्य केले असून, त्याची परतफेड करण्यात अडचणी येतील आणि बँका व वित्तीय संस्थांवर त्याचा विपरित परिणाम होईल, असे सांगून ते म्हणाले की, या बाबी ध्यानात आणून देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची अनेकदा वेळ मागितली, पण आम्हाला त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही या मोर्चाचे आयोजन केले आहे.
प्लॅस्टिकबंदीच्या विरोधात उत्पादकांचा शुक्रवारी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 03:05 IST