Join us

मल्ल्यांच्या ६,००० कोटींच्या संपत्तीवर टाच

By admin | Updated: August 8, 2016 04:49 IST

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि अन्य यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्यानुसार नव्याने कारवाई करण्याची तयारी केली आहे

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि अन्य यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्यानुसार नव्याने कारवाई करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार विजय मल्ल्या यांच्या ६,००० कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात येणार आहे. बँक कर्ज फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात येणार आहे, तर ईडीने यासाठी ६,००० कोेटी रुपयांच्या संपत्तीची पाहणीही करून ठेवली आहे. मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यानुसार (पीएमएलए) दुसऱ्या टप्प्यात ही कारवाई करण्यात येणार आहे. नोटीस जारी करूनही मल्ल्या हे न्यायालयासमोर हजर झाले नाहीत. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मल्ल्या आणि त्यांच्या कुटुंबाची चल-अचल संपत्ती आणि शेअर यांची माहिती ईडीने घेतली आहे. मल्ल्यांशिवाय ज्या व्यक्तींची नावे या प्रकरणात आहेत त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाऊ शकते. ही तपास एजन्सी न्यायालयातून मल्ल्यांविरुद्ध ‘फरार व्यक्ती’ असा आदेश मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. हा आदेश पुढे परराष्ट्र मंंत्रालयाला पाठविला जाईल. ईडीने काही महिन्यांपूर्वी पीएमएलएअंतर्गत मल्ल्या यांची १,४११ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. (प्रतिनिधी)