Join us  

मल्ल्याच्या कर्जाची माहिती नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:12 AM

बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेला किंगफिशरफेम विजय मल्ल्याला किती कर्ज दिले आहे, याची माहिती नाही, असे केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने म्हटले आहे.

नवी दिल्ली : बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेला किंगफिशरफेम विजय मल्ल्याला किती कर्ज दिले आहे, याची माहिती नाही, असे केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने म्हटले आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये एका व्यक्तीने मल्ल्याच्या कर्जाचा तपशील वित्तमंत्रालयाला मागितला होता.याला दिलेल्या उत्तरात अर्थमंत्रालयाने कळविले की, मल्ल्याला दिलेल्या कर्जाची नोंद आमच्याकडे नाही, ती माहिती संबंधित बँका वा रिझर्व्ह बँकेकडेच असू शकेल, पण यावर आता माहिती आयोगाने शंका व्यक्त केली आहे. कारण याच अर्थमंत्रालयाने या आधी मल्ल्याच्या कर्जाची माहिती संसदेत दिली होती. अर्थराज्यमंत्री संतोष गंगवार यांनी १७ मार्च २0१७ रोजी संसदेत दिलेल्या एका उत्तरात मल्ल्याने २00४ मध्ये घेतलेले कर्ज फेब्रुवारी २00८ पर्यंत फेडणे अपेक्षित होते, पण ते न भरल्याने ८,0४0 रुपयांचे कर्ज थकीत घोषित करण्यात आले, तसेच वसुलीसाठी मल्ल्याची १५५ कोटींची मालमत्ता लिलावाद्वारे विकण्यात आली, असेही सांगितले होते. त्यामुळे ही माहिती नसल्याच्या अर्थमंत्रालयाचा दावा अर्थहीन ठरतो.>जगतोय ऐषारामाचे जीवनविजय मल्ल्याने आपल्या व्यवसायांच्या नावावर बँकांकडून ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न करता, तो इंग्लंडला पळून गेला. सध्या तो लंडनमध्ये आलिशान फार्म हाउसमध्ये ऐषारामाचे जीवन जगत आहे. तो कर्जफेड करीत नाही आणि त्याने पलायन केले असल्याने, सीबीआय व एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांनी मल्ल्याच्या अनेक मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. मल्ल्याला फरारही घोषित करण्यात आले आहे. त्याला भारतात आण्यासाठीही तपास यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे.

टॅग्स :विजय मल्ल्या