Join us

प्राप्तिकराची किमान मर्यादा ३ लाख करा

By admin | Updated: February 2, 2015 03:52 IST

अर्थकारणात येत असलेला सुधार लक्षात घेता सामान्य करदात्यांना दिलासा देण्यासाठी प्राप्तिकरासह विविध कॉर्पोरेट करात कपात करण्याची मागणी

मुंबई : अर्थकारणात येत असलेला सुधार लक्षात घेता सामान्य करदात्यांना दिलासा देण्यासाठी प्राप्तिकरासह विविध कॉर्पोरेट करात कपात करण्याची मागणी उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘असोचेम’ने केली आहे. प्राप्तिकराची मर्यादा वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या पुढे आखत प्राप्तिकराची सध्याची कमाल मर्यादा दहा लाख रुपयांवरून वाढवून १२ लाख रुपये करण्याची मागणी केली आहे. उद्योगांना बळकटी देण्यासाठी आणि गुंतवणुकीला पोषक वातावरण करण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने कर आकारणी प्रणाली मोडीत काढण्याचीही असोचेमद्वारे मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, संपुआ सरकारच्या काळात स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनीदेखील किमान मर्यादा तीन लाख रुपये करण्याची मागणी करीत त्या आधारे सरकारला अंकगणित मांडून दाखविले होते; मात्र अशा पद्धतीने कर मर्यादा वाढविल्यास सरकारी तिजोरीचे किमान ६० हजार कोटी रुपयांनी नुकसान होईल, असे सांगत तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी ही मागणी फेटाळली होती; परंतु आता सत्तेत भाजपाप्रणीत सरकार असल्याने ही मागणी शक्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. परिणामी, सरकार ही मागणी उचलून सामान्यांना दिलासा देणार का, याकडे लक्ष लागले आहे.’इंधनाच्या वाढत्या किमती, परकीय चलनाचा असमतोल, परिणामी वाढणारी वित्तीय तूट यामुळे सामान्य करदात्यांसाठी एकूणच विकास कामांना कात्री लावण्याची वेळ यापूर्वी सरकारवर आली होती; मात्र आता परिस्थितीत सुधार होत असल्याचे दिसून आल्यावर सरकारने काही अप्रत्यक्ष करात वाढ करून वित्तीय तूट भरून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, तसेच सरकारी तिजोरी आणखी भक्कम करण्यासाठी काही इंधनांसह विविध प्रकारच्या अनुदानातही कपात करण्याचे संकेत दिले आहेत. (प्रतिनिधी)