Join us  

रिझर्व्ह बँकेने चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठीच्या नियमात केला  मोठा बदल, असा आहे नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 10:55 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेने उच्च मूल्य असलेल्या चेक क्लीअरबाबतच्या नियमांमध्ये फेरबदल केला आहे.

ठळक मुद्दे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून उच्च मूल्य असलेल्या चेक क्लीअरबाबतच्या नियमांमध्ये फेरबदल पन्नास हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या सर्व चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरू करण्याचा निर्णयया प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँकेकडून दिशानिर्देश जारी करण्यात येणार आहेत

नवी दिल्ली - आता बदलत्या काळानुसार अॉनलाइन व्यवहार वाढत असले तरी अजूनही चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे जर तुम्ही चेकद्वारे अधिकाधिक व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने उच्च मूल्य असलेल्या चेक क्लीअरबाबतच्या नियमांमध्ये फेरबदल केला आहे. रिझर्व्ह बँकेने चेक पेमेंटमध्ये होणाऱ्या फेरफारीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी आणि फसवणुकीच्या घटना कमी करण्यासाठी एक नवी व्यवस्था सुरू केली आहे. 

रिझर्व्ह बँकेने पन्नास हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या सर्व चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवस्थेंतर्गत चेक जारी करण्याच्यावेळी बँकेकडून तिच्या ग्राहकाकडून दिलेल्या माहितीच्या आधारावर चेक वठवण्यासाठी संपर्क साधला जाईल. ही व्यवस्था देशातील जारी झालेल्या एकूण चेकच्या मूल्याच्या आधारावर क्रमशः सुमारे २० टक्के व्यवहारांना कव्हर करेल. तसेच मूल्याच्या आधारावर चेकद्वारे होणाऱ्या देवाणघेवाणीपैकी ८० टक्के रक्कम या अंतर्गत येईल. या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँकेकडून दिशानिर्देश जारी करण्यात येणार आहेत. 

पॉझिटिव्ह पे सिस्टीमनुसार खातेदाराकडून लाभार्थ्यांना चेक देण्यात येण्यापूर्वी जारी करण्यात येणाऱ्या चेकचे विवरण जसेकी चेकचा क्रमांक, चेकची तारीख,  नाव, खाते क्रमांक, रक्कम यांच्यासोबत चेकच्या पुढच्या आणि मागच्या बाजूचा फोटो द्यावा लागेल. जेव्हा लाभार्थी चेक वठवण्यासाठी जमा करेल तेव्हा बँक पॉझिटिव्ह पे सिस्टिममधून चेकच्या विवरणाची पडताळणी केली जाईल. जर हे विवरण योग्य असेल तर चेक वठवला जाईल.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र