नाशिक- विधानसभा निवडणुकीत भाजपा १९ आणि शिवसेना ५९ जागांवर सतत पराभूत होत असते त्या जागांमध्येच आता महायुतीत फेरविचार सुरू असून, निवडून येण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे त्यांना त्या जागा दिल्या जाऊ शकतात, म्हणजे अदलाबदल होऊ शकते, असे मत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी व्यक्त केले.विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू असून त्यामुळे अगदी युती तुटण्याच्या चर्चा होत आहेत. नाशिक दौर्यावर आलेल्या विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना त्याचे खंडन केले. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपामध्ये चर्चा सुरू असून, सुकाणू समितीत निर्णय होणार आहेत. तथापि, भाजपा आणि सेना यांच्यात परंपरागतरीत्या ज्या जागांवर पराभव होत आहे, अशा जागांवर विचार केला जात आहे. राज्यात विधानसभेचे १९ मतदारसंघात भाजपा, तर ५९ मतदारसंघात शिवसेना सातत्याने पराभूत होत आहे. त्या जागांवर उमेदवार विजयी कसा करता येईल, याचा विचार सुरू आहे. जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच येथे कशी संधी देता येईल याबाबत विचार केला जात आहे, असे सांगून या जागांमध्ये कितपत अदला बदल होईल किंवा निश्चित आकडा किती याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. मात्र, अनेक पक्षांमधून भाजपा आणि सेनेत लोक येत असल्यामुळे त्यांचाही विचार करावा लागेल, असे सांगून तावडे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने राज्याचे वाटोळे करून ठेवले आहे, त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळणार आहे. परंतु त्याचबरोबर पराभूत जागांमध्ये जे उमेदवार विजयी होतील ते बोनस ठरणार असून, त्यादृष्टीने चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले. स्वाभिमानी संघटना, तसेच अन्य मित्र पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे. तसेच उमेदवारांची यादी तयार होत असून, लवकरच उमेदवार घोषित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
सतत हरणार्या जागांबाबत महायुतीत फेरविचार विनोद तावडे : लवकरच उमेदवारांची घोषणा शक्य
By admin | Updated: September 6, 2014 00:38 IST