Join us

विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल

By admin | Updated: February 9, 2015 00:56 IST

एप्रिल २000 पासून देशात आलेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी ४९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजधानी (एनसीआर) यांना मिळाली आहे.

नवी दिल्ली : एप्रिल २000 पासून देशात आलेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी ४९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजधानी (एनसीआर) यांना मिळाली आहे. त्यातही महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक ३0 टक्के आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. एप्रिल २000 ते नोव्हें. २0१४ या काळात भारतात एकूण २३६.४६ अब्ज डॉलरची गुंतवणूक आली. महाराष्ट्रात त्यातील ७0.४१ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक आली. भारतात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत हा आकडा ३0 टक्के आहे. याच काळात एनसीआरला ४५.७७ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक मिळाली. एनसीआरमध्ये दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा काही भाग येतो. एनसीआरमध्ये आलेल्या गुंवणुकीचा देशातील एकूण गुंतवणुकीतील वाटा १९ टक्के आहे. क्षेत्रनिहाय आकडेवारी पाहता सर्वाधिक विदेशी गुंतवणूक सेवा क्षेत्रात आली. त्यापाठोपाठ दूरसंचार, धातू, वीज, संगणक हार्डवेअर व सॉफ्टवेअर आणि बांधकाम या क्षेत्रांचा क्रमांक लागतो. देशनिहाय वर्गवारीनुसार, मॉरिशसमध्ये ८३.७३ अब्ज डॉलरची गुंतवणूक आली. त्यापाठोपाठ सिंगापुरात २९.१९ अब्ज डॉलर, ब्रिटनमध्ये २१.७६ अब्ज डॉलर, जपानमध्ये १७.५५ अब्ज डॉलर, अमेरिकेत १३.२८ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली.