Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पान - महाराष्ट्र सदन -

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST


महाराष्ट्र सदनात लोकेश चंद्र रूजू

- राष्ट्रपती राजवटीनंतर मलिकांवर निशाणा
नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांनी
महाराष्ट्राचे राजधानीतील वादग्रस्त निवासी आयुक्त बीपिन मलिक यांना बाजुला केले. मलिक सध्या प्रशिक्षणासाठी लंडनला गेल्याने त्यांचा पदभार शुक्रवारी महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक व राजशिष्टाचार विभागाचे सचिव म्हणून रूजू झालेल्या लोकेश चंद्र यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मलिक लंडनहून परतल्यावर अमेरिकेला जाणार असल्याने आता मलिक यांचा पदभार काही महिने चंद्र यांच्याकडे राहणार आहे. त्यातच मलिक आता निवासी आयुक्त म्हणून काम पाहण्याची शक्यता कमी झाली. ते साडेतीन वर्षांपासून या पदावर आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे त्यांना सहकार्य मिळाले होते. आता या दोन्ही बाबी त्यांच्या बाजूने नाहीत. सदनातील गैरसोयी व शिवसेना खासदारांचे आंदोलन व त्यानंतरचे चपाती प्रकरण हे सारेच मलिक यांना प्रतिकूल ठरले.
लोकेशचंद्र रूजू झालेले पद एक वर्षापासून रिक्त होते. लोकेशचंद्र हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९९३ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र सदन येथे रूजू होण्यापूर्वी ते वाणिज्य मंत्रालयात सहसचिव होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भंडारा, गोंदिया व नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. नागपूर महापालिकेचे ते आयुक्तही होेते. (विशेष प्रतिनिधी)