नितीन गव्हाळे, अकोलामहाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या रांगामधील निसर्गरम्य वातावरण, किल्ले, कोकणाचा समुद्र किनारा, वेरूळ, अजिंठ्यातील पुरातन लेणी भारतीयांसोबतच विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. निसर्गसंपन्न, डोंगरदऱ्यांचा, ऐतिहासिक गड, किल्ल्यांचा महाराष्ट्र विदेशी पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. गत दोन वर्षात महाराष्ट्रात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. देशामध्ये अनेक देखणी स्थळं आहेत. त्यात महाराष्ट्रातील प्रेक्षणीय आणि देखणी स्थळं पर्यटकांना साद घालतात. निसर्गसंपन्न, सुंदर समुद्र किनारा, डोंगरदऱ्या पर्यटकांना खुणावतात आणि महाराष्ट्रीयन लोकांची आदरातिथ्य करण्याची पद्धत पर्यटकांना भावते. पर्यटकांना महाराष्ट्र देशातील इतर राज्यांपेक्षा अधिक सुरक्षित वाटतो. त्यामुळेच महाराष्ट्रात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. २0१३ मध्ये ४१ लाख ५६ हजार विदेशी पर्यटकांनी महाराष्ट्रातील पर्यटनाचा आनंद घेतला आणि २0१४ मध्ये ४३ लाख ६0 हजार विदेशी पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिली. देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने प्रयत्न केल्यास विदेशी पर्यटक आणखी वाढू शकतात.
विदेशी पर्यटकांच्या पसंतीला उतरतोय महाराष्ट्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2015 00:48 IST