Join us

मॅगीला शिसे बाधले!

By admin | Updated: June 16, 2015 02:55 IST

लोकप्रिय खाद्यपदार्थात गणना होणाऱ्या मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण मानवी शरीरास घातक पातळीपेक्षा कितीतरी जास्त आढळल्याने राज्य

मुंबई : लोकप्रिय खाद्यपदार्थात गणना होणाऱ्या मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण मानवी शरीरास घातक पातळीपेक्षा कितीतरी जास्त आढळल्याने राज्य आणि आता देशपातळीवर बंदीची व्याप्ती वाढत असून, यामुळे आजवर कंपनीला ३२० कोटी रुपयांचा झटका बसल्याची माहिती पुढे आली आहे. मानवी प्रकृतीला घातक असलेले शिसे खुद्द मॅगीलाच अशा प्रकारे बाधले आहे. उपलब्ध माहितीनुसार, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर ५ जूनपासून सर्वच राज्यात मॅगीवर बंदी घालण्यात आली असून विक्री बंद पडली आहे. विक्री बंद पडल्यामुळे तर फटका बसला आहेच, पण यानंतर आता कंपनीने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविलेला माल परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उत्पादनात आलेली मंदी, विक्रीत बसणारा फटका आणि आता माल परत बोलाविण्यासाठी येणारा खर्च यामुळे गेल्या दहा दिवसांत कंपनीला ३२० कोटी रुपयांचा फटका बसल्याचे गणित मांडले जात आहे. कंपनीच्या समभागांतही सातत्याने घसरण होताना दिसत आहे. कंपनीच्या मॅगी या उत्पादनासंदर्भात अपप्रचार झाल्याचा युक्तिवाद करून ही बंदी मागे घेण्याची कंपनीची मागणी आता न्यायालयानेही फेटाळली असून तूर्तास तरी कंपनीच्या अडचणी दूर होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. (प्रतिनिधी)उत्तर प्रदेशातून सुरू झाली पनवतीमॅगीमध्ये शिशाचे प्रमाण नियमापेक्षा अधिक असल्याचे पहिल्यांदा उत्तर प्रदेशातील एका प्रयोग शाळेतील तपासणीत आढळून आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर इतर राज्यांत मॅगीमधील या घातक द्रव्याचा खुलासा झाला. त्यावरून अनेक राज्यांनी मॅगीच्या विक्रीवर बंदी घातली होती. त्यानंतर केंद्रीय खाद्य नियामकानेही कारवाई केली. त्यामुळे मॅगीच्या विक्रीवर देशव्यापी निर्बंध आले. यावर मॅगीने बाजारातील पाकिटे परत घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचवेळी मॅगी सुरक्षित असल्याचा दावाही केला.