Join us  

अर्थतज्ज्ञ नाहीत गव्हर्नर शक्तिकांत दास, M.A.चा विषय होता इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 5:19 PM

देशाच्या गव्हर्नरदासाठी कुठल्याही विशिष्ट शिक्षणाची अट नाही.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1980 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी शक्तिकांत दास यांची मंगळवारी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. नोटाबंदीचा प्रभाव जनतेवर पडू नये, यासाठी शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. मात्र, 28 वर्षात प्रथमच देशाला एका अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण न घेणारे म्हणेज अर्थतज्ज्ञ अशी ओळख नसलेले गव्हर्नर मिळाले आहेत. 

देशाच्या गव्हर्नरदासाठी कुठल्याही विशिष्ट शिक्षणाची अट नाही. अर्थ मंत्रालयाच्या शिफारसीनंतर पंतप्रधान कार्यालयातून आरबीआयचे गव्हर्नर ठरविण्यात येतात. मंगळवारी शक्तिकांत दास यांनी देशाचे 25 वे गव्हर्नर म्हणून आपला पदभार स्विकारला आहे. ते 14 वे नोकरशहा असून 12 वे आयएएस किंवा आयसीएस वर्गातील अधिकारी आहेत. मात्र, शक्तिकांत यांनी आपले पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण इतिहास विषय घेऊन दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केले. तर, आयआयएम बंगळुरू येथून त्यांनी फायनान्सियल मॅनेजमेंट कोर्सही पूर्ण केला आहे. मात्र, यापूर्वीचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि रघुराम राजन हे अर्थशास्त्र विषयात पदवीधर होते. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघात त्यांची उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ  म्हणून ओळख होती. त्यामुळे सन 1990 पासून आजपर्यंतच्या कार्यकाळात शक्तिकांत दास हे पहिले गव्हर्नर आहेत, जे अर्थतज्ज्ञ नाहीत. त्यापूर्वी एस. वेंकटरमन हे गव्हर्नर होते. वेकटरमन यांप्रमाणेच शक्तिकांत दास हेही अर्थ मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते. तर अगोदर ते महसूल विभागात सचिवपदी नियुक्त होते.

दरम्यान, भाजपा खासदार आणि नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आपल्या पदाचा दुरुपयोग करू शकतात, अशीही भीती सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केली आहे. शक्तिकांत दास यांनी अनेक न्यायालयीन प्रकरणात माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिलं आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपंतप्रधानउर्जित पटेल