Join us  

लक्झरी कार्सच्या विक्रीत २५ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 3:10 AM

लक्झरी श्रेणीमध्ये मुख्यत: मर्सिडीज-बेन्झ, टोयोटा, निस्सान, आॅडी व बीएमडब्ल्यू या वाहनांचा समावेश होतो.

मुंबई : अति आरामदायक (लक्झरी) श्रेणीच्या कार्सच्या विक्रीमध्ये या वर्षी २५ टक्के घट झाली आहे. २०१८ मध्ये प्रथम सहामाहीत २०,००० लक्झरी कार विकल्या गेल्या होत्या. या वर्षी हा आकडा १५,००० पर्यंत खाली आला असण्याचा अंदाज वाहन उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

लक्झरी श्रेणीमध्ये मुख्यत: मर्सिडीज-बेन्झ, टोयोटा, निस्सान, आॅडी व बीएमडब्ल्यू या वाहनांचा समावेश होतो. या वर्षी वाहन उद्योगात मंदीचे सावट आहे. त्यामुळे सर्वच वाहन कंपन्यांची विक्री कमी झाली आहे, परंतु मंदीचा सर्वाधिक फटका लक्झरी कार श्रेणीला बसला आहे.

या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था मंदीतून जात आहे, शिवाय या वाहनांवर वस्तू व सेवाकर (जीएसटी) सर्वाधिक आहे. याशिवाय या कार साधारणत: दोन कोटींपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेली श्रीमंत मंडळीच घेतात. या वर्षीच्या अर्थसंकल्पात दोन कोटींपेक्षा अधिक उत्पन्नावरील आयकरावर अधिभार वाढला आहे. शिवाय सुट्या भागांची आयात महाग झाली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून विक्रीत घट झाली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.