Join us

रिझर्व्ह बँक छापणार कमी रकमेच्याच नोटा

By admin | Updated: January 5, 2017 02:36 IST

नोटबंदीनंतर केवळ दोन हजार रुपयांच्या नोटांचीच छपाई मोठ्या प्रमाणात झाल्याने देशभरात सुटे मिळण्याचा गोंधळ निर्माण झाला आणि लोकांना अतिशय त्रास सहन करावा लागला.

मुंबई : नोटबंदीनंतर केवळ दोन हजार रुपयांच्या नोटांचीच छपाई मोठ्या प्रमाणात झाल्याने देशभरात सुटे मिळण्याचा गोंधळ निर्माण झाला आणि लोकांना अतिशय त्रास सहन करावा लागला. आता परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चुकांची दुरुस्ती करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी यापुढे ५०० रुपये किंमतीच्या व त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांची छपाई करण्यात येत असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ५00 रुपये, १00 रुपये व त्याहून कमी मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआय कायद्याखाली केलेल्या अर्जाच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेने त्यांना ही माहिती दिली आहे. मात्र ५०० रुपयाच्या नोटाच्या छपाईसाठीचा अंदाजे खर्च अद्याप निश्चित करण्यात आला नसल्याचे रिझर्व्ह बँकेने कळविलेले आहे. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार ५०० रुपयांच्या नोटाच्या मुद्रणावर अंदाजे किती खर्च येईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. रिझर्व्ह बँकेने ८ नोव्हेंबरपूर्वी ५०० व त्याहून कमी मूल्याच्या नोटा छापल्या असत्या, तर सामान्यांना बॅँकेच्या रागेत उभे राहणे, त्यापैकी काहींचे रांगेत उभे असताना वा पैसे मिळतील का, या चिंतेने जे मृत्यू झाले, ते टळले असते, असे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)