Join us

अल्प बचत योजनांच्या व्याजदरात कपात

By admin | Updated: April 1, 2017 00:58 IST

लोक भविष्य निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या अल्प बचत योजनांवरील

 नवी दिल्ली : लोक भविष्य निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या अल्प बचत योजनांवरील व्याजदरात 0.१ टक्क्याची कपात करण्यात आली आहे. २0१७-१८ या वित्त वर्षाच्या एप्रिल-जून या तिमाहीसाठी ही कपात करण्यात आली आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून बँकाही आपल्या व्याजदरांत कपात करू शकतात.जानेवारी-मार्च या तिमाहीच्या तुलनेत एप्रिल-जून या तिमाहीत बचत योजनांवर 0.१ टक्का कमी व्याज मिळेल. बचत ठेवींवरील (सेव्हिंग्ज डिपॉजिट) व्याजदर ४ टक्के असा कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षी एप्रिलपासून बचत योजनांवरील व्याजदर तिमाही आधारावर ठरविण्यात येत आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, पीपीएफवर आता वार्षिक ७.९ टक्के व्याज मिळेल. पाच वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरही एवढेच व्याज मिळेल. सध्या या दोन्ही योजनांवर ८ टक्के व्याज मिळत होते. किसान विकास पत्रावर आता ७.६ टक्के व्याज मिळेल.तसेच ही पत्रे ११२ महिन्यांत परिपक्व होतील. सुकन्या समृद्धी योजनेवर ८.४ टक्के व्याज मिळेल. सध्या ते ८.५ टक्के होते. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवर ८.४ टक्के व्याज मिळेल. एक ते पाच वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ६.९ टक्के ते  ७.७ टक्के राहील. आवर्ती ठेवींवर (आरडी) ७.२ टक्के व्याज मिळेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)बँकाही व्याजदर कमी करू शकतीलवित्त मंत्रालयाने व्याजदर निश्चित करताना म्हटले की, सरकारच्या निर्णयानुसार अल्प बचत योजनांचा व्याजदर तिमाही आधारावर निश्चित केला जातो. नवे दर १ एप्रिलपासून लागू होतील. सूत्रांनी सांगितले की, सरकारच्या या निर्णयातून प्रेरणा घेऊन बँकाही आपल्या अल्प बचत योजनांचा व्याजदर कमी करू शकतात.