नवी दिल्ली : परवडणा-या दराच्या हवाई सेवेने देशातील छोटी शहरे जोडण्याच्या व्यापक योजनेचा एक भाग म्हणून कमी खर्चाच्या विमान कंपन्यांनंतर आता अशा शहरांमध्ये फक्त किमान आवश्यक सोयी-सुविधा असलेले कमी खर्चाचे (लो-कॉस्ट) विमानतळ उभारण्याचे सरकारने ठरविले आहे.देशांतर्गत विमानप्रवासाची सोय महानगरांखेरीज अन्यत्र पोहोचविण्यासाठी ५० छोट्या शहरांमध्ये असे ‘लो कॉस्ट’ विमानतळ उभारण्यात येणार असून असे पाच विमानतळ याच वित्तीय वर्षात विकसित करावेत, असे पंतप्रधान कार्यालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयास सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अशा कमी खर्चाच्या विमानतळांची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे विमानतळ मुंबई किंवा दिल्लीच्या भपकेबाज व चकाचक विमानतळांहून अगदी वेगळे असतील व तेथे विमान प्रवासासाठी किमान आवश्यक अशाच सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तेथे सामानाची ने-आण करण्यासाठी ‘कन्व्हेयर बेल्ट’ नसतील, त्यामुळे प्रवाशांना स्वत:च सामान वाहून न्यावे लागेल. असे विमानतळ वातानुकूलितही नसतील. या विमानतळांवर ‘अरायव्हल लाऊन्ज’ही नसेल. बोर्डिंग पास घेऊन व सुरक्षा तपासणी करून विमानात बसण्याखेरीज विमानतळावर प्रवाशांनी अन्य काही करणे अपेक्षित नसल्याने त्यांचा प्रत्यक्ष विमानोड्डाणापूर्वीचा प्रतीक्षाकाळ जेमतेम अर्ध्या तासाचा असेल. साहजिकच या प्रतीक्षा काळातील विरंगुळा, खरेदी, खानपान इत्यादी सेवांना कात्री लावल्याने विमानतळ परिचालनाचा खर्च कमी होईल. या ‘लो कॉस्ट’ विमानतळांवर आल्यानंतर प्रवासी किमान आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यावर सामानासह थेट विमानात जाऊन बसू शकतील. येणारे प्रवासी विमानातून उतरले की थेट विमानतळाबाहेर पडून आपापल्या इच्छित स्थळी रवाना होऊ शकतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
५० शहरांत उभारणार कमी खर्चाचेविमानतळ
By admin | Updated: July 31, 2014 23:24 IST