Join us  

आयात बंदी हटविल्याने कडधान्याचे दर गडगडले, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:27 PM

केंद्र सरकारने कडधान्यावरील आयात बंदी पूर्णत: हटविल्यामुळे विदेशातून कडधान्याची आवक वाढत असून, स्थानिक कडधान्याचे दर हमीभावापेक्षाही खाली आले आहेत.

जळगाव : केंद्र सरकारने कडधान्यावरील आयात बंदी पूर्णत: हटविल्यामुळे विदेशातून कडधान्याची आवक वाढत असून, स्थानिक कडधान्याचे दर हमीभावापेक्षाही खाली आले आहेत. हा निर्णय होऊन आठवडादेखील झाला नाही तोच उदीड, मूग, तूर यांच्या भावात दीड ते दोन हजार, तर हरभऱ्यात ६०० ते ७००  रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. हमीभावापेक्षाही कमी दरात माल खरेदी केल्यास व्यापारीदेखील अडचणीत येणार आहेत. यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन आयात बंदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.  कडधान्याच्या आयातीला चार वर्षांपासून मर्यादित प्रमाणात परवानगी होती. मात्र, केंद्र सरकारने आता  आयातीला पूर्णत: परवानगी दिली आहे. विदेशातून आवक वाढल्याने बाजार समित्यांमध्ये स्थानिक पातळीवरून येणाऱ्या कडधान्याच्या भावात घसरण झाली व कडधान्याचे दर हमीभावाच्या खाली घसरले आहेत. यात हमीभावापेक्षा कमी किमतीत माल खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. या भीतीमुळे व्यापारीही धास्तावले आहेत.  

दाल मिल व्यवसायावर परिणाम केंद्र शासनाच्या चुकीच्या व धरसोड धोरणामुळे कडधान्य, डाळ व्यवसायावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होईल. त्यामुळे जळगावसह देशातील दाल मिल व्यवसाय भविष्यात आणखीच डळमळीत होऊ शकतो, असाही धोका आहे. केंद्र सरकारने कडधान्य आयात बंदीचा निर्णय त्वरित घ्यावा आणि आगामी काळातील दुष्परिणाम टाळावा, अशी मागणीदेखील संघटनेने केली आहे. याबाबत असोसिएशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, कृषिमंत्री नरेंद्र तोमर, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन आयात बंदीची मागणी केली आहे.

टॅग्स :केंद्र सरकारबाजार