Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या विकासासाठी एलआयसी देणार दीड लाख कोटी रुपये

By admin | Updated: March 12, 2015 00:18 IST

रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी व त्यांच्या विकासासाठी आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) दीड लाख कोटी रुपये गुंतविणार आहे. रे

नवी दिल्ली : रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी व त्यांच्या विकासासाठी आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) दीड लाख कोटी रुपये गुंतविणार आहे. रेल्वे आणि आयुर्विमा महामंडळ यांच्यात यासाठी बुधवारी सामंजस्य करार (एमओयू) झाला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या करारामुळे या दोन्ही संस्थांना मोठा लाभ होईल, असे करारावर स्वाक्षरीप्रसंगी सांगितले. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित होते.येत्या पाच वर्षांमध्ये हे दीड लाख कोटी रुपये रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतविले जातील. आर्थिक वर्ष २०१५-२०१६ पासून ही गुंतवणूक इंडियन रेल्वेज फिनान्स कॉर्पोरेशनच्या (आयआरएफसी) रोख्यांच्या (बाँडस्) माध्यमातून केली जाईल. दीड लाख कोटी रुपये उभे करणे ही खूप महत्त्वाची घटना आहे. पैसा अशा व्याजदराने मिळत आहे की त्याने रेल्वे आणि आयुर्विमा महामंडळ अशा दोघांनाही लाभ होणार आहे. या निधीमुळे रेल्वेला प्रकल्प गतीने राबविता येतील, असे प्रभू म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रसंगी सांगिंतले की, सरकारी संस्था एवढ्या प्रचंड प्रमाणात व व्यावसायिकरीत्या वाढून देशसेवा करू शकते हे या महामंडळाने सिद्ध केले आहे. सरकारी उपक्रमांबद्दलचा नकारात्मक भाव महामंडळाने जनमानसातून दूर केला आहे.