ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - आर्थिक कचाट्यात सापडेल्या रेल्वेला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाने अर्थात एलआयसीने पुढाकार घेतला आहे. एलआयसी पुढील पाच वर्षांत रेल्वेमध्ये तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचे सुतोवाच केले होते. प्रभूंच्या या संकल्पाला एलआयसीने पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रेल्वे व एलआयसीमध्ये करार झाला. अर्थमंत्री अरुण जेटली व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यानुसार एलआयसी दरवर्षी ३० हजार कोटी याप्रमाणे पाच वर्षात १.५ लाख कोटी रुपये रेल्वेत गुंतवणार आहे. यामध्ये एलआयसी भारतीय रेल्वे वित्त निगमसारख्या रेल्वेच्या विविध विभागांमधील बॉंड विकत घेणार आहे. या गुंतवणुकीसाठी एलआयसीला किती व्याज दिला जाईल यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र या कराराद्वारे दोन्ही संस्थांचा लाभच होईल असा आशावाद अधिका-यांनी व्यक्त केला.