Join us

आजपासून अल्प बचतीवर कमी व्याज

By admin | Updated: April 1, 2016 03:52 IST

लोक भविष्य निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र (केबीपी) आणि ज्येष्ठ नागरिक जमा यासारख्या लघु बचत योजनांच्या, व्याजदरात करण्यात आलेली १.३ टक्का कपात शुक्रवार

नवी दिल्ली : लोक भविष्य निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र (केबीपी) आणि ज्येष्ठ नागरिक जमा यासारख्या लघु बचत योजनांच्या, व्याजदरात करण्यात आलेली १.३ टक्का कपात शुक्रवार, दि. १ एप्रिलपासून लागू होत आहे. यापुढे सरकार दर तीन महिन्याला या व्याजदरांचा आढावा घेणार आहे.१ एप्रिल ते ३० जून या अवधीत पीपीएफवर ८.१ टक्का व्याजदर दिला जाणार आहे. आतापर्यंत हा दर ८.७ टक्के होता. किसान विकास पत्रावरील व्याजदर ८.७ वरून कमी करून ७.८ करण्यात आला आहे. आता ज्येष्ठ नागरिकांच्या पाच वर्षांच्या जमा ठेवीवर व्याजदर ९.३ ऐवजी ८.६ होणार आहे. वित्तमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार छोट्या मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी खात्यावरील आता ९.२ ऐवजी ८.६ टक्के व्याज मिळणार आहे.आतापर्यंत व्याजदर वार्षिक आधारावर निश्चित केले जात होते. आता ते दर तीन महिन्याला निश्चित केले जाणार आहेत; मात्र टपालघरातील बचतीवर असलेले चार टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत. लोकप्रिय ठरलेल्या पाच वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर आता ८.१ टक्के व्याज मिळेल. ते आतापर्यंत ८.५ टक्के होते. पाच वर्षांच्या मासिक उत्पन्न खात्यावर ८.४ ऐवजी ७.८ टक्के व्याज मिळेल.सध्या किसान विकासपत्रात मूळ रक्कम १०० महिने किंवा ८ वर्षे चार महिन्यांत दुप्पट होते. ती आता ११० महिन्यांत किंवा नऊ वर्षे २ महिन्यांत दुप्पट होईल.