अहमदनगर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल करताना लाखो रुपयांची खरेदी बॅँकांकडून केली जाते. ‘एलबीटी’खाली बँकांनी महापालिकेकडे नोंदणी केली; मात्र एक रुपयाचाही एलबीटी भरला नाही. अशा ३१ सहकारी, नागरी बँकांना महापालिकेने नोटिसा पाठविल्या असून आजपर्यंत त्यांनी आयात केलेल्या मालाचे विवरण मागविले आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) खाली शहरातील राष्ट्रीयीकृत, नागरी अशा ३१ बँकांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. स्टेशनरी, मुहूर्तावर सोन्याचे नाणे, संगणक, एटीएम मशीन्स व अन्य खरेदी बॅँका करतात. शहरात संस्था म्हणून खरेदी केलेल्या प्रत्येक मालावर महापालिकेला एलबीटी अदा केला पाहिजे, असा नियम आहे. मात्र लाखो रुपयांची खरेदी करूनही महापालिकेला कळविले नाही. राष्ट्रीयीकृत बँकांची खरेदी त्यांच्या प्रधान कार्यालयातून केली जाते. खरेदी केलेला हा माल नगर शहरातील बँकांना पाठविण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या मालावर महापालिकेला एलबीटी भरणे गरजेचे असताना बॅँकांनी महापालिकेला न कळविता एलबीटी चुकविला. अशा ३१ बँकांचे विवरण उपायुक्त अजय चारठाणकर यांनी तपासले. त्यात या ३१ बँकांनी रुपयाचाही एलबीटी महापालिकेला अदा केलेला नाही. त्यामुळे त्यांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय उपायुक्त चारठाणकर यांनी घेतला आहे. ४सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले की, ग्राहक म्हणून खातेदारांकडून बँका सेवाकर वसूल करतात. लाखो रुपयांची खरेदी बँकेकडून केली जाते. ४एलबीटीसाठी महापालिकेकडे ३१ बँकांनी नोंदणी केली आहे. मात्र खरेदी केलेल्या मालाचे विवरणपत्र दाखल केले नाही. त्यामुळे बँकांना नोटीस पाठविली जाणार आहे, असेही चारठाणकर म्हणाले.
एलबीटी चुकवेगिरी; ३१ बॅँकांना नोटिसा
By admin | Updated: March 19, 2015 23:27 IST