मुंबई : २0१५ या वर्षाचा शेवटचा दिवस शेअर बाजारांसाठी तेजीचा राहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५८ अंकांनी वाढून २६,११७ अंकांवर बंद झाला. २0१५ हे वर्ष मात्र बाजारासाठी वाईट ठरले. या वर्षात बाजार ५ टक्क्यांपेक्षाही जास्त प्रमाणात घसरला. २0११ नंतर प्रथमच बाजाराने वार्षिक पातळीवर घसरण नोंदविली आहे.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह २५,९८0.८६ अंकांवर उघडला होता. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स नंतर १५७.५१ अंकांच्या अथवा 0.६१ टक्क्याच्या वाढीसह २६,११७.५४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५0.१0 अंकांनी अथवा 0.६३ टक्क्याने वाढून ७,९४६.३५ अंकांवर बंद झाला. २0१५ या वर्षात सेन्सेक्स तब्बल १,३८१.८८ अंकांनी अथवा ५.0२ टक्क्यांनी घसरला आहे. आदल्या वर्षी सेन्सेक्स तब्बल ३0 टक्क्यांनी वाढला होता. या आधी २0१११ साली सेन्सेक्सने २४ टक्क्यांची विक्रमी घसरण नोंदविली होती. खरे म्हणजे यंदा वर्षाच्या सुरुवातीला सेन्सेक्स चांगली कामगिरी करताना दिसून आला. ४ मार्च रोजी तो ३0,0२४ अंकांवर पोहोचला होता. ही सेन्सेक्सची आजपर्यंतची सर्वोच्च पातळी ठरली होती. आरबीआयने व्याजदरात कपात केल्याचा लाभ तेव्हा सेन्सेक्सला मिळाला होता. त्यानंतर मात्र सेन्सेक्स घसरणीला लागला. सरत्या वर्षात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३३६.३५ अंकांनी घसरला. ही घसरण ४.0६ टक्के आहे. २0११ नंतर निफ्टीनेही पहिल्यांदाच वार्षिक आधारावर घसरण नोंदविली आहे. ४ मार्च रोजी निफ्टी ९,११९.२0 अंकांवर होता. ही त्याची सर्वोच्च पातळी ठरली होती. यंदा विदेशी गुंतवणूकदारांनी बाजाराकडे पाठ फिरविल्यामुळे घसरण झाल्याचे जाणकारांनी सांगितले. गेल्या वर्षभरात फक्त ३ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक शेअर बाजारात आली. गेल्या वर्षी हाच आकडा २0 अब्ज डॉलरचा होता. २0१५ या वर्षात रुपया डॉलरच्या तुलनेत ५ टक्क्यांनी घसरला. एचडीएफसीचा समभाग सर्वाधिक २.३९ टक्के राहिला. त्याखालोखाल गेल, कोल इंडिया, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आरआयएल, मारुती सुझुकी, टीसीएस, एम अँड एम, टाटा स्टील, आयटीसी यांचे समभागही वाढले. अॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्प, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, डॉ. रेड्डीज, टाटा मोटर्स, सिप्ला यांचे समभाग मात्र घसरले. जागतिक पातळीवर आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. युरोपात मात्र सकाळी नरमाईचा कल दिसून येत होता. (वृत्तसंस्था)- गुरुवारच्या व्यवहारात बीएसई रिअल्टी निर्देशांक १.५२ टक्क्याने वाढला. त्याखालोखाल टेक्नॉलॉजी, मेटल, आॅईल अँड गॅस आणि पॉवर हे निर्देशांक वाढले. व्यापक बाजारातही मजबुतीचा कल राहिला. स्मॉलकॅप 0.४९ टक्क्याने तर मिडकॅप 0.३५ टक्क्याने वाढला.
शेवटचा दिस गोड झाला; वर्ष मात्र कडू!
By admin | Updated: January 1, 2016 01:15 IST