Join us
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या १४ महिन्यांत भारताचा तेल वापर सर्वाधिक गतीने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:43 IST

२0१८च्या पहिल्या महिन्यात भारताची खनिज तेलाची मागणी १0.३ टक्क्यांनी वाढली असून, ही सलग चौथ्या महिन्यातील वाढ आहे. त्या आधी गेल्या १४ महिन्यांत भारताचा तेल वापर सर्वाधिक गतीने वाढला असून, तो १६.९ दशलक्ष टनांवर गेला आहे.

नवी दिल्ली : २0१८च्या पहिल्या महिन्यात भारताची खनिज तेलाची मागणी १0.३ टक्क्यांनी वाढली असून, ही सलग चौथ्या महिन्यातील वाढ आहे. त्या आधी गेल्या १४ महिन्यांत भारताचा तेल वापर सर्वाधिक गतीने वाढला असून, तो १६.९ दशलक्ष टनांवर गेला आहे. वर्षभरापूर्वी तो १५.३ दशलक्ष टन होता.तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण विभागाने ही माहिती दिली आहे. जीएसटीनंतर रस्त्यांवरील मालवाहतुकीतझालेली सुधारणा, तसेच कार व स्कूटरच्या वापरातील वाढ ही यामागील कारणे आहेत, असे विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत भारताचा तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात घसरून १३ वर्षांच्या नीचांकावर गेला होता. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्थाच ठप्प झाल्यामुळे तेलाचा वापर घसरला होता.सूत्रांनी सांगितले की, भारताचा डिझेल वापर १४.५ टक्के वाढून ६.६५ दशलक्ष टनांवर गेला आहे. पेट्रोलचा वापर १५.६ टक्के वाढून २.0९ दशलक्ष टनांवर गेला. द्रवरूप पेट्रोलियम गॅसची मागणी ४.६ टक्क्यांनी वाढून २.0८ दशलक्ष टनांवर गेली. पेट्रोलियम कोकचा वापर ९.२ टक्क्यांनी वाढून १.९८ दशलक्ष टनांवर गेला.वाहन उत्पादकांच्या ‘सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) या संघटनेने म्हटले की, प्रवासी वाहनांची विक्री येत्या मार्चमध्ये ९ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.२0३0 पर्यंत अशीच वाढआंतरराष्टÑीय ऊर्जा संस्थेच्या अंदाजानुसार, २0३0 सालापर्यंत भारत जागतिक तेल मागणीच्या केंद्रस्थानी असेल, तोपर्यंत भारताची पेट्रोल-डिझेलची मागणी दुप्पट झालेली असेल. वास्तविक, २0३0 मध्ये फक्त इलेक्ट्रिक वाहने विकण्याची महत्त्वाकांक्षा भारताने जाहीर केली आहे.

टॅग्स :व्यवसाय