Join us

न दिलेल्या धनादेशाची रक्कम लुटली

By admin | Updated: November 24, 2014 03:19 IST

पंजाब नॅशनल बँक खात्यातून परस्पर पाच लाख ७५ हजारांची रक्कम हडपण्यात आल्याची तक्रार निनाद जयवंत त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे

ठाणे : पंजाब नॅशनल बँक खात्यातून परस्पर पाच लाख ७५ हजारांची रक्कम हडपण्यात आल्याची तक्रार निनाद जयवंत त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. ते मुलूंड पूर्व येथील मिठागर भागातील श्री साई प्रसाद सोसायटीतील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे मूळ धनादेश जयवंत यांच्या ताब्यात असतानाही त्यांच्या खात्यातून ही रक्कम काढण्यात आल्याने पोलिसही चक्रावले आहेत.जयवंत यांचे नौपाडयाच्या पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे. त्यांचा बेल्ट बनिविण्याचा व्यवसाय आहे. बँकेशी झालेल्या कराराप्रमाणे ५० लाखापर्यंतचे क्रेडीट त्यांना मंजूर करण्यात आले आहे. आपले बँक खाते ते आॅनलाईन पाहणी करीत असताना त्यांच्या खात्यातून ५ लाख ७५ हजारांची रक्कम काढण्यात आल्याचे त्यांच्या १८ नोव्हेंबर रोजी निदर्शनास आले. ज्या धनादेशाने रक्कम काढल्याचे त्यांना समजले तो धनादेश मात्र जयवंत यांच्याकडेच होता. तरीही इतकी मोठी रक्कम काढण्यात आल्याने त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला.झारखंडच्या दर्ग शाखेतून न्यू पनवेलच्या महाराष्ट्र बँकेत ही रक्कम ट्रान्सफर झाल्याची माहिती बँकेने त्यांना दिली. मात्र, योग्य उत्तरे न मिळाल्याने त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात बँकेच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची पोलीसांकडून बँकेकडेही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक एम. बी. थोरवे यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक कोळेकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या अजब प्रकारामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. (प्रतिनिधी)