लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जीएसटी अंतर्गत करवाढ झाली असली तरी केसांचे रंग आणि शांपू यांसारख्या वैयक्तिक उपयोगाच्या वस्तूंच्या किमती वाढविण्यात येणार नाहीत, असे वेस्टित ग्राहक वस्तू उत्पादक कंपन्यांनी म्हटले. विश्लेषक आणि कंपन्यांच्या कार्यकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुळातच ग्राहकी घटलेली आहे. नव्या करवाढीला विरोधी कंपन्या कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्यासाठी कंपन्या प्रतीक्षा करीत आहेत. त्यातच सरकारने नफेखारीविरोधी कायदा केला आहे. तसेच किंमत वाढवायची असल्यास किमान दोन वृत्तपत्रांत जाहिरात देण्याचे बंधनही सरकारने घातले आहे. त्यामुळे कंपन्या दरवाढ करण्याचे टाळत आहेत. केवीन केअरचे चेअरमन सी. के. रंगनाथन यांनी सांगितले की, कोणीही किमती वाढवायला तयार नाही. पण ते किती दिवस तग धरतील? दोन महिने, तीन महिने? आम्ही वाट पाहू. कर वाढल्यामुळे आमचा नफा ५ टक्क्यांनी कमी होईल. कोलकात्यातील इमामी आणि मुंबईतील गोदरेज या कंपन्या स्वस्त झालेल्या वस्तूंच्याच किमतीत सुधारणा करीत आहेत. ज्या वस्तूंवरील कर वाढला आहे, त्या वस्तूंच्या किमती आहे त्याच ठेवण्यात येत आहेत. इमामीचे संचालक हर्ष अग्रवाल यांनी सांगितले की, ‘बाजार स्थिती आणि स्पर्धात्मक घडामोडी यावर किमती बदलायच्या की नाही ते ठरेल.’ गोदरेज कंझुमरचे एमडी विवेक गंभीर म्हणाले की, ‘जीएसटीमुळे मिळालेला फायदा उद्योगांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे. करवाढ मात्र कंपन्या स्वत:च सहन करीत आहेत.’।किमती केल्या कमीइमामीने आपल्या ‘सेवन आॅईल्स इन वन’ या तेलाची किंमत ६ ते ८ टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. भारतातील सर्वांत मोठी ग्राहक वस्तू उत्पादक कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने पीअर्स आणि डव्ह या साबणाच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. टीसीएसकडून फिएमा डी विल्स आणि विवेल या साबणांच्या किमती कमी करण्यात येत आहेत. कोलगेट पामोलिव्हने टूथपेस्ट आणि टूथब्रशच्या किमती ८ ते ९ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
करवाढीनंतरही वस्तूंच्या किमती कायम ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 00:16 IST