Join us

दूध उत्पादन वाढीसाठी कामधेनू दत्तक ग्राम योजना

By admin | Updated: January 15, 2015 06:04 IST

विदर्भात निर्माण झालेल्या दूध तुटवड्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी पशुधन विभागाने कामधेनू दत्तक ग्राम योजना हाती घेतली आहे.

रूपेश उत्तरवार, यवतमाळविदर्भात निर्माण झालेल्या दूध तुटवड्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी पशुधन विभागाने कामधेनू दत्तक ग्राम योजना हाती घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक दुधाळ जनावरे असणाऱ्या गावांची निवड करण्यात येत आहे. यासोबतच दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजनाही सुचविली जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावाला एक लाख ५२ हजारांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.मागणीच्या तुलनेत दुधाचे उत्पादन पाच ते दहा टक्केच आहे. परिणामी विदर्भातील जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्राकडून दुधाची आयात करावी लागते. दररोज लागणारे दूध मिळविण्यासाठी औरंगाबाद, परभणी, अहमदनगर यासह अनेक जिल्ह्यांकडे धाव घ्यावी लागते. विदर्भाला दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामध्ये संपूर्ण गाव दत्तक घेतले जाणार आहे. इतकेच नव्हे, तर दूध उत्पादन वाढीसाठी सर्व प्रयत्न गावपातळीवर राबविले जाणार आहेत.दूध उत्पादनात महत्त्वाचा घटक असलेला चारा सकस कसा करता येईल यासाठी प्रात्यक्षिक करून घेतले जाणार आहे. यासोबतच अधिक दुधाचे उत्पादन असणाऱ्या गावांना गोधन पालकांची भेट घडवून आणली जाणार आहे. दुधाळ जनावरांचे आरोग्य तपासण्यासाठी पशुधन विभागाचे कॅम्प गावपातळीवर घेतले जाणार आहेत. वांझ गायींना या ठिकाणी तपासले जाणार आहे. जंत निवारण आणि गोचिड निर्मूलन सोबतच गोठा फवारणी करण्यात येणार आहे. शेणखतापासून कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया ग्रामस्थांना समजावून सांगितली जाणार आहे.