Join us  

कार्लोक कॅपिटल, जालान जेट एअरवेजचे नवे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 4:08 AM

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील २६ कर्जदात्यांनी जेट एअरवेजविरुद्ध दाखल केलेल्या दिवाळखोरी अर्जास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने जून २०१९ मध्ये मान्यता दिली होती. 

नवी दिल्ली : दिवाळखोरीत निघालेली जेट एअरवेज ही कंपनी ब्रिटनमधील कार्लोक कॅपिटल आणि यूएईचे व्यावसायिक मुरारीलाल जालान यांना विकण्यात येणार आहे. जेट एअरवेजच्या कर्जदात्या बँकांनी हा निर्णय घेतला आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील २६ कर्जदात्यांनी जेट एअरवेजविरुद्ध दाखल केलेल्या दिवाळखोरी अर्जास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने जून २०१९ मध्ये मान्यता दिली होती. जेट एअरवेज ही दिवाळखोरीत निघालेली भारतातील पहिली हवाई वाहतूक कंपनी ठरली आहे. दिवाळखोरी प्रक्रियेनुसार कर्जदात्या बँक समूहाने जेट एअरवेजचा ताबा घेऊन तिच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागविल्या होत्या. त्यात कार्लोक आणि जालान यांनी बाजी मारली आहे.कार्लोकचे भागीदार आयगोर स्टार्हा यांनी सांगितले की, ‘जेट एअरवेजच्या कर्जदात्यांच्या बैठकीत आमच्या कन्सॉर्टियमची निवड करण्यात आली आहे.’सूत्रांनी सांगितले की, हरियाणास्थित फ्लाईट सिम्युलेशन टेक्निक सेंटर, मंबईतील बिग चार्टर आणि अबुधाबूची इम्पेरियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स या कंपन्याही स्पर्धेत होत्या.कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेली जेट एअरवेज ही भारतातील सर्वांत जुुनी खाजगी हवाई वाहतूक कंपनी आहे. निधीची कमतरता आणि थकलेली देणी यामुळे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीचे विमान उड्डाण थांबले होते. संकटात असलेल्या कंपनीवर बँकांचे ८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. व्हेंडर्स आणि कर्मचाऱ्यांचे हजारो कोटी रुपयेही कंपनीकडे थकले आहेत.अनेक आव्हाने सामोरीजेट एअरवेजच्या नव्या मालकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सध्याच्या कर्ज जबाबदाºया व कर्मचाऱ्यांची थकलेली देणी त्यांना आधी चुकती करावी लागणार आहेत. हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी विमानांची नव्याने साफसफाई आणि दुरुस्ती-देखभाल करून घ्यावी लागणार आहे. कारण अनेक दिवसांपासून ही विमाने पडून आहेत. दुरुस्ती-देखभालीवर मोठा खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :जेट एअरवेज