Join us  

नोकऱ्या वाढूनही संधी मिळेना; नव्या पिढीने करायचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 10:06 AM

चार वर्षांतील ईपीएफओ खात्यांतून माहिती समोर, २०१८-१९ ते २०२१-२२ या काळात या वयोगटातील नव्या ईपीएफ खात्यांत २६ टक्के वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेमुळे चर्चेत आलेल्या १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांच्या बाबतीत निराशाजनक माहिती समोर आली आहे. रोजगार निर्मितीमधील या वयोगटातील तरुणांची भागीदारी सातत्याने घटत आहे. मागील चार वर्षांत ईपीएफओच्या नव्या खात्यांत या वयोगटातील तरुणांचा टक्का कमी झाला आहे. हा कल यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.

२०१८-१९ ते २०२१-२२ या काळात या वयोगटातील नव्या ईपीएफ खात्यांत २६ टक्के वाढ झाली आहे. मात्र याच काळात सर्व वयोगटांतील शुद्ध रोजगार निर्मिती तब्बल ९८ टक्क्यांनी वाढली आहे. त्या तुलनेत १८ ते २१ वर्षे वयोगटातील रोजगार निर्मिती बरीच मागे पडल्याचे दिसून येते. वस्तू उत्पादन, उत्पादन आणि किरकोळ विक्री क्षेत्रात जेव्हा घसरण होते, तेव्हा नव्या रोजगारावर सर्वाधिक परिणाम होतो.

कंत्राटी नोकऱ्याही कारणीभूतकोरोना साथीच्या काळात औपचारिक क्षेत्रात जेवढ्या संख्येने तरुणांना विशेषत: फ्रेशर्सना नोकरीवरून काढून टाकण्यात आले, तेवढ्या तरुणांना अजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. औपचारिक क्षेत्रात कंत्राटी रोजगारांचा कल वाढला आहे. एकूण ईपीएफओ नोंदणीमधील तरुणांची हिस्सेदारी घटण्यामागे हेही एक कारण आहे.  - डाॅ. प्रवीण झा, अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक

एनपीएसचे आकडे मिळेनात ईपीएफप्रमाणेच एनपीएस खात्यातूनही रोजगाराची आकडेवारी मिळते. तथापि, त्यांच्याकडे १८ ते २१ या वयोगटातील वर्गाची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नाही.

का होतो परिणाम?१८ ते २१ वयोगटातील रोजगार निर्मिती बरीच मागे पडल्याचे दिसून येते. नव्या नोकऱ्या वाढल्या असल्या तरी या वयोगटातील रोजगाराच्या संधी मर्यादित झाल्या आहेत. वस्तू उत्पादन, उत्पादन आणि किरकाेळ विक्री क्षेत्रात जेव्हा घसरण होते, तेव्हा नव्या रोजगारावर सर्वाधिक परिणाम होतो.

टॅग्स :नोकरी