Join us
Daily Top 2Weekly Top 5

दागिने निर्यात जाणार ४0 अब्ज डॉलरवर

By admin | Updated: October 9, 2014 03:35 IST

लोकांचा सोने खरेदीकडे वाढलेला कल आणि त्यामुळे दशकात झालेली मोठी आयात यामुळे भारत आता सर्वाधिक सोने असलेला देश ठरू शकतो.

मुंबई : लोकांचा सोने खरेदीकडे वाढलेला कल आणि त्यामुळे दशकात झालेली मोठी आयात यामुळे भारत आता सर्वाधिक सोने असलेला देश ठरू शकतो. देशातील सोन्याचा साठा २२ हजार टनाच्या घरात गेला आहे. २0२0 पर्यंत देशातून होणाऱ्या दागिन्यांच्या निर्यातीत पाचपट वाढ होऊन ती ४0 अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने व्यक्त केला आहे. भारत जगासाठी ज्वेलर ठरू दे, असे कौन्सिलने म्हटले आहे.कौन्सिलच्या अंदाजानुसार सोन्याशी संबंधित ५0 लाख नवीन रोजगार निर्माण होतील, त्यामुळे या क्षेत्रातील रोजगारांचा आकडा दुप्पट झालेला असेल. यासाठी कारागिरांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम हाती घ्यावा लागणार असून, देशांतर्गत साठ्यातून आणि उत्पादनातून ४0 टक्के मागणी पूर्ण व्हावी लागेल; तसेच सरकारनेही स्थिर धोरण अवलंबिणे गरजेचे आहे, असे मत कौन्सिलचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुदरम पीआर यांनी म्हटले आहे. मुंबईत झालेल्या दुसऱ्या इंडिया इंटरनॅशनल बुलियन समीटमध्ये ते बोलत होते.सोन्याची आयात कमी करण्यासाठी केवळ आयात शुल्क वाढविण्यापेक्षा सरकारने देशातील सोन्याचा साठा बाहेर येण्यासाठी तुर्कस्तानप्रमाणे सोने हे वैध चलन ठरवावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सध्या देशातील बँकांमध्ये सुवर्ण बचत योजनेखाली कमीत कमी ५00 ग्रॅम सोने जमा करता येते. याचा सर्वसामान्य व्यक्तीला लाभ होत नाही. तुर्कस्तानने नागरिकांना किमान १ ग्रॅम सोने जमा करण्याची मुभा दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)