Join us
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांच्या विक्रीत ४0 टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: June 12, 2014 00:24 IST

सोन्याच्या किमती उतरत असताना सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत ४0 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चेन्नई : सोन्याच्या किमती उतरत असताना सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत ४0 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. एका बाजूला ही चांगली बातमी असतानाच दहा वर्षांत जेवढे सोन्याचे स्मगलिंग झाले असेल तेवढे गेल्या वर्षभरात झाल्याचा दावाही फेडरेशनने केला आहे.चेन्नई येथे सराफ व्यावसायिकांसाठी आयोजित कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलताना फेडरेशनचे उपाध्यक्ष मनीष जैन यांनी सांगितले, की रिझर्व्ह बँकेने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. त्यामुळे दागिन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत मे महिन्याशी तुलना करता २0 ते २५ टक्क्यांनी ही विक्री वाढली असून, वार्षिक पद्धतीने तुलना करता ही वाढ ४० टक्क्यांच्या घरात आहे, असेही ते म्हणाले. २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाल्याचे फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष एन. अनंत पद्मनाभन यांनी सांगितले. ते म्हणाले, की सध्या दागिन्यांसाठी सोन्याचा पुरेसा पुरवठा होत नाही. सराफांकडेही फारसा साठा नाही.बँकांकडे असलेल्या सोन्याचा वापर होत आहे. परंतु ते पुरेसे ठरणार नाही. स्मगलिंगवर मत व्यक्त करताना जैन म्हणाले, की गेल्या १२ महिन्यांत यात वाढ झाली आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे आता दागिन्यांचेही स्मगलिंग होत आहे. या पार्श्वभूमीवर फेडरेशनने अर्थमंत्र्यांची भेट घेतली असून, सोने आयातीवरील कर १0 टक्क्यांवरून २ टक्कयांपर्यंत कमी करावा, तसेच दागिन्यांच्या आयातीवर कर आकारावा, अशी मागणी केली आहे.(वृत्तसंस्था)