Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेट एअरवेज दिवाळखोरीच्या मार्गावर; पुनरुज्जीवनासाठी कुणीही पुढे येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:45 IST

कर्जपुरवठा करणाऱ्या बँक समूहाचीही झाली कोंडी

मुंबई : जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्वीकारार्ह प्रस्तावच येत नसल्यामुळे कंपनीला कर्ज देणाºया बँक समूहाची मोठीच कोंडी झाली आहे. ही कोंडी न फुटल्यास जेट एअरवेजला दिवाळखोरीत काढण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांनी कंपनीच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीची मुख्य कर्जदाता स्टेट बँक आॅफ इंडिया, सरकारी अधिकारी पुनरुज्जीवनाबाबत अजूनही आशावादी आहेत. तथापि, बँक समूहातील इतर बँका मात्र फारशा आशावादी दिसत नाहीत. एका बँक अधिकाºयाने सांगितले की, कंपनीच्या ब्रँड मूल्याशिवाय फारशा मालमत्ता हातात नाहीत. केवळ ब्रँडसाठी कंपनीचे कर्ज स्वीकारायला कोणीही तयार नाही.ही कोंडी न फुटल्यास जेट एअरवेज दिवाळखोरीकडे ढकलली जाईल. शमाँ व्हिल्स आणि गग्गर एंटरप्राइजेस या दोन परिचालन कर्जदात्यांनी राष्ट्रीय कंपनी लवादासमोर जेटच्या दिवाळखोरीसाठी अर्जही दाखल केले आहेत. २० जून रोजी त्यावर सुनावणी होत आहे. दोन्ही कंपन्यांचे कर्ज थोडे आहे. शमाँचे ६ कोटी रुपये तर गग्गरचे सुमारे १ कोटी रुपये जेटकडे थकले आहेत. (वृत्तसंस्था)वसुलीसाठी लागतील रांगाकाही समाधान योजना उभी न राहिल्यास जेटच्या इतर कर्जदारांचीही वसुलीसाठी रांग लागेल. परिचालन कर्जदाता कंपनी एरिक्सनने रिलायन्स कम्युनिकेशनकडून न्यायालयामार्फत ५७६ कोटी रुपये वसूल करण्यात नुकतेच यश मिळविले आहे; पण जेट एअरवेजची समस्या अधिक कठीण आहे. कारण जेटच्या व्यवस्थापनावरील सर्व प्रमुख लोक राजीनामे देऊन बाहेर पडले आहेत.

टॅग्स :जेट एअरवेज