नगरमध्ये दोन हजार कोटींची गुंतवणूक जपानी उद्योजक उत्सुक : सुपा-पारनेर एमआयडीसी;भूसंपदनाची प्रक्रिया सुरू
By admin | Updated: September 13, 2014 00:01 IST
अहमदनगर : सुपा- पारनेर औद्योगिक वसाहतीत जपानी उद्योजकांनी दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे़ उद्योगासाठी भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, संपादीत केलेल्या क्षेत्रावर जपानी उद्योगाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता रामदास खेडकर यांनी शुक्रवारी येथे दिली़
नगरमध्ये दोन हजार कोटींची गुंतवणूक जपानी उद्योजक उत्सुक : सुपा-पारनेर एमआयडीसी;भूसंपदनाची प्रक्रिया सुरू
अहमदनगर : सुपा- पारनेर औद्योगिक वसाहतीत जपानी उद्योजकांनी दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे़ उद्योगासाठी भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, संपादीत केलेल्या क्षेत्रावर जपानी उद्योगाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता रामदास खेडकर यांनी शुक्रवारी येथे दिली़ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सुपा- पारनेर औद्योगिक वसाहतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली़ खेडकर म्हणाले, सुपा औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्याचा निर्णय झाला आहे़ विस्तारीकरणासाठी बाबुर्डी, वाघुंडे, म्हसणे, सुलतानपूर आणि पळवे खुर्दमधील ९२७ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे़ यापैकी वाघुंडे गावातील ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे़ त्याबदल्यात शेतकर्यांना २३ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे़ उर्वरित शेतकर्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ महामंडळाच्या अधिकार्यांनी नुकताच जपान दौरा केला़ तेथील उद्योजकांच्या भेटी घेतल्या़ सुपा येथे उद्योग सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली़ त्यानंतर तेथील उद्योजकांनी काही दिवसांपूर्वी सुपा औद्योगिक वसाहतीस भेट देऊन पाहणी केली़ जपानी उद्योजकांनी फार्मा आणि ॲटो इंजिनिअरिंग क्षेत्रात जवळपास दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. (प्रतिनिधी)